पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १३ मे
जामखेड येथील नगर रोडवरील आग विझवण्याच्या फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊन मध्ये आग लागुन तिथे काम करत असणाऱ्या दोन कामगारांचा त्यात होरपळून मृत्यू झाला.
तर दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. सदर घटनेबाबत पोलीस विभागाकडून गांभीर्यपूर्वक पावले उचलली जात असून घटनास्थळावरील नमुने घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या फाॅरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच याबाबत तपासणी व आवश्यक त्या सर्व बाबींची पडताळणी करून गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे.
या घटनेत ज्ञानेश्वर चंद्रकात भोडवे ,वय ४५ घोडेगाव.ता.जामखेड व जहिर अब्दुल सत्तार मुल्ला (वय ४२) रा. तेरखेडा ता. वाशी जिल्हा उस्मानाबाद या दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
या बाबत सविस्तर जामखेड येथील नगररोड बाफना पेट्रोल पंपाजवळील रविंद्र शेळके व पंकज शेळके यांच्या मालकीचे
आग विझवण्याचे फायरबाॅल तयार करण्याचे वर्कशॉप आहे. या
ठिकाणी आज दि. १३ मे रोजी १२ :३० वाजेच्या सुमारास कामगार ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व जहिर अब्दुल सत्तार मुल्ला
हे दोन कामगार काम करत होते. तर यातील दोन जखमी तिथेच बाजूला थांबलेले असताना अचानक आग लागली. आतील कामगारांना काही समजण्याच्या आतच आग्निने रौद्र रूप धारण केले. वर्कशॉप मधुन धुराचे मोठे लोळ बाहेर येत होते. तसेच आगीमुळे आतमध्ये आसलेल्या फायरबॉलचे स्फोट होतच होते. या स्फोटांच्या अवाजाने आजुबाजूचे लोक धावत बाहेर आले मात्र धुराचा लोळ प्रचंड होता.
दरम्यान जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला तातडीने बोलावण्यात आले. अग्निशामक बंब व जमलेल्या नागरीकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेले. जेसीबी च्या सहाय्याने या वर्कशॉपला पाठीमागून भगदाड पाडण्यात आले. परिणामी दिड तासांनंतर आग आटोक्यात आली. आग आटोक्यात आल्यानंतर आतमध्ये जाऊन पाहीले असता कामगार ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व जहिर अब्दुल सत्तार मुल्ला या दोन जणांचा जागेवरच होरपळून मुत्यू झाला असल्याचे दिसून आले. तसेच आगीने रौद्र रूप धारण करण्यापुर्वी तिथेच बाजुला आसलेल्या गणेश पवार रा.जामखेड व पुजा पठाडे वय २४ असे दोन जण जखमी झाले आहेत.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच ही माहिती माजी सरपंच सुनील कोठारी व संदेश कोठारी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली. त्यांनी संजय कोठारी तातडीने आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले होते. त्याच बरोबर अग्नीशामक दलाचे जवान अय्याज शेख, विजय पवार, अहमद सय्यद, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, अनिल भारती व त्यांचे सहकारी, शंकर बोराटे, दिपक भोरे, तनवीर मुलानी, निखिल कुमकर, गोकुळ जाधव, सनी सदाफुले, बापु गायकवाड, विशाल ढवळे, सुनील मोरे सह अनेक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व त्यांच्या सहकार्यांनी मदत केली.
या घटनेमुळे जामखेड शहरात मोठी खळबळ उडाली होती. तसेच वर्कशॉप मधील स्फोटांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेजारी राहणारे सर्व रहिवासी आपल्या मुलाबाळांसह घराबाहेर पडले होते. यामध्ये काही लहान मुलंही किरकोळ जखमी झाली. तर काही घरांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात घाबरलेले होते. या घटनेची योग्य ती चौकशी करून दुर्घटनाग्रस्ताना योग्य न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
चौकट..
रवींद्र शेळके यांचे फायरबाॅल वर्कशॉप कधीपासून आहे? या वर्कशॉपला लोकवस्तीत परवानगी कशी मिळाली? इतके उन्हात ज्वलनशील असलेल्या फायरबाॅल वर्कशॉप मध्ये काम कसे सुरु होते? या दुर्घटनेत मयत कामगारांना न्याय मिळेल का?
No comments:
Post a Comment