जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर
चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या दोघा भामट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले आहे. अटक केलेले आरोपी कृष्णा भास्कर चक्रे (३०) व गजानन फकिरा जाधव (३२, दोघे रा. ओमसाईनगर, कमळापूर, रांजणगाव) अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक चोरीची दुचाकी, धारदार चाकू, मोबाईल आणि ४ हजार रुपये रोख असा मिळून सुमारे ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रमेश शिवलाल राठोड (३२, रा. जो गेशवाडी, जामखेड ह.मु. बजाजनगर) हा वाळूज औद्योगिक परिसरात काम करतो. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोलगेट चौकातून घराकडे जात असताना आरोपींनी दुचाकीवरून येऊन त्याच्यावर चाकूचा धाक दाखवला. त्यांनी मोबाईल हिसकावून घेत फोनपेचा पासवर्ड मागवला व खात्यातील ८०५० रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करून त्याला जीवे मारण्याची धमकी देत पसार झाले.या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी केला. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने बिकेटी कंपनीजवळ आरोपींना पकडले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दुचाकीसह लुटीतील वस्तू जप्त करण्यात आल्या.या आरोपींविरोधात वाळूज, वेदांतनगर आणि छावणी पोलीस ठाण्यांत मिळून आठ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या चौकशीत आणखी काही लुटीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा