आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025
22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरच्या आविष्कार कॉलनीत उघडकीस आली आहे. मृत तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार (रा. वांजूळ पोही, जि. आहिल्यानगर) असे आहे. आत्महत्येपूर्वी तिने "मम्मी, दादा, आजी-आजोबा, मला माफ करा" अशी मन पिळवटून टाकणारी सुसाईड नोट लिहिली आहे.
निकिता फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून अवघ्या दीड महिन्यांपूर्वीच नोकरीसाठी संभाजीनगरला आली होती. ती आविष्कार कॉलनीतील खोलीत राहत होती व वोक्हार्ट कंपनीत कार्यरत होती. आत्महत्येच्या दिवशी ती खोलीत एकटीच होती. शनिवारी ती कामावर गेली नसल्याने शेजारील मुलींनी तिला हाक मारली. मात्र, प्रतिसाद न मिळाल्यामुळे खिडकीतून पाहिले असता ती गळफास घेतलेली स्थितीत दिसून आली. लगेचच पोलिसांना माहिती देण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी निकिताच्या मृत्यूमागे ब्लॅकमेलिंगचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. आत्महत्येच्या आदल्या दिवशी तिने कुटुंबीयांना फोन करून “एक अनोळखी नंबरवरून फोन येईल, तो स्वीकारू नका; ब्लॅकलिस्टमध्ये टाका” अशी सूचना दिली होती. तरीदेखील तिच्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर त्या नंबरवरून तब्बल 25 वेळा कॉल आल्याचे समोर आले आहे.
सिडको पोलिसांनी निकिताचा मोबाईल जप्त करून तपास सुरू केला आहे. नेमके कोण व्यक्ती किंवा गट तिला ब्लॅकमेल करत होते आणि या प्रकरणामागचे सत्य काय, याचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे, अचानक झालेल्या या घटनेने निकिताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा