कर्जत-जामखेड, ता. १४ – गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने फुटलेल्या मोहरी (ता. जामखेड) तलावाची आमदार रोहित पवार यांनी स्वखर्चातून दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली असून त्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. तसेच अतिवृष्टीने काही ठिकाणी फुटलेला कुकडी व सीना कालवा आणि त्यावरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठीही सरकारने निधी द्यावा, यासाठीही त्यांनी जलसंपदा विभागाला पत्र दिले आहे. याबाबत जलसंपदा विभागाने प्रदेश व मंडळ स्तरावरून तातडीने प्रस्ताव मागवला आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने मोहरी तलावाच्या सांडव्याचा भराव आणि लगतच्या सुरक्षा भिंतीला मोठे भगदाड पडले. यामुळे हा संपूर्ण तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने तीन पोकलँड उपलब्ध करुन देत तात्पुरत्या स्वरुपाच्या दुरुस्तीचा प्रयत्न केला होता, परंतु आता पाऊस थांबल्याने कायमस्वरुपी दुरुस्तीचे काम तातडीने होणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील काही दिवसांतच या तलावातील पाणी वाहून जाऊन आजूबाजूच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारकडून या दुरुस्तीला उशीर होत असेल तर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वखर्चातून ही दुरुस्ती करण्याची तयारी आ. रोहित पवार यांनी दाखवली आहे आणि तसे पत्रही त्यांनी जलसंपदा विभागाला दिले आहे. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव मंडळ व प्रदेश स्तरावरून तातडीने मागवून घेण्याचा आदेश विभागाने दिला आहे.
अतिवृष्टीमुळे सीना उजवा कालवा बाभुळगाव खालसा येथील जलसेतूजवळ आणि माहीजळगाव येथील माळेवस्तीजवळ अशा दोन ठिकाणी फुटून लगतच्या शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. तसेच कुकडी डावा कालवा कि.मी. २०६ व २०७ वर तसेच चिलवडी शाखा कालवा कि.मी. १८ व १९ मध्ये फुटला आहे. कर्जत तालुक्याचा विचार केला तर हे दोन्ही कालवे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. येत्या रब्बी आणि इतर हंगामातील आवर्तनासाठी या फुटलेल्या कालव्यांची तत्काळ दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध करुन तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणीही आमदार रोहित पवार यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. तसेच सीना नदीवरील १३ बंधारे असून त्यापैकी ६ बंधारे हे सीना प्रकल्पाच्या अंतर्गत येतात, उर्वरित ७ बंधारे हे बीड जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येतात. मागील महिन्यात अतिवृष्टीने यापैकी अनेक बंधाऱ्यांच्या बाजूचा भराव वाहून गेला असून नदीने प्रवाह बदलल्याने लगतच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बंधाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात कर्जत मतदारसंघातील शेती आहे. उन्हाळी हंगामासाठी हे सर्वच बंधारे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांचीही तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणीही आमदार रोहित पवार यांनी विखे-पाटील यांच्याकडे केली. कालव्याची आणि या कालव्यावरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्रदेश आणि मंडळ कार्यालयाकडून तातडीने मागवून घेण्याचा आदेश यावर जलसंपदा विभागाने दिला आहे.
दरम्यान, जलसंपदा, जलसंधारण, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाकडील अनेक बंधाऱ्यांचेही अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांचीही दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यासाठीही आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे मागणी केली असून या बंधाऱ्यांचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडून या सर्व कामांना मिळणारी गती पाहता कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
--------..
कोट
*‘‘मोहरी तलावाची तातडीने दुरुस्ती होणं आवश्यक आहे, परंतु त्यासाठी सरकारकडून उशीर होत असेल तर ग्रामस्थांच्या मदतीने आमची स्वखर्चातून दुरुस्ती करण्याची तयारी आहे. तशी परवानगी आम्ही जलसंपदा विभागाकडे मागितली असून परवानगी दिल्यास जलसंपदा विभागाच्या देखरेखीखाली दुरुस्तीचं हे काम केलं जाईल. सीना कालव्याची आणि त्यावरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासकीय निधी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. सरकारकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो, याची प्रतिक्षा आहे. या कामास उशीर झाल्यास येत्या काही महिन्यातच पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळं सरकारनेही याबाबतचा प्रस्ताव मागितला असून प्रशासनाकडूनही कार्यवाही सुरु आहे, फक्त सरकारकडून हे काम तातडीने होईल, ही अपेक्षा! जलसंपदा, जलसंधारण, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाकडील अनेक बंधाऱ्यांचंही नुकसान झालं असून त्यांच्याही दुरुस्तीची विनंती सरकारला केली असून त्याचंही सर्वेक्षण सुरु आहे.’’*
- रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा