कर्जत/ जामखेड |
सध्या संपूर्ण राज्यभरात पाळीव जनावरांमध्ये लंपी या आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघातही या आजाराने अनेक प्राण्यांना गाठले आहे. हा एक विषाणूजन्य साथीचा आजार असून एका जनावराकडून दुसऱ्या जनावरास होऊ शकतो आणि त्याचा प्रसार आता सध्या नगर जिल्हयात खूप वेगाने होत आहे. या आजारामुळे जनावरे मृत्युमुखी पडू शकतात आणि प्रामुख्याने जनावरांमध्ये त्वचेवर गाठी येऊन त्याचे रूपांतर जखमेत होते.सध्या कर्जत-जामखेड तालुक्यात याचे प्रमाण कमी असले तरी येत्या काळात ते वाढू शकतं यासाठी आमदार रोहित पवार यांनी खबरदारी घेत मतदारसंघात याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सरकारकडे सध्या लंपी आजारावरील लसीचा तुटवडा आहे आणि या आजाराबाबत सविस्तर माहिती पशू पालकांकडेही नाही. पशू पालकांची ही स्थिती लक्षात घेऊन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी लंपी स्किन आजाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि लसीचे वितरण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्जत शहरातील श्रीराम मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पशुपालक, दूध संकलक, पशू वैद्यकीय अधिकारी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरकारकडे असलेला लसीचा तुटवडा लक्षात घेता आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या वतीने १ लाख जनावरांना पुरतील एवढ्या लम्पी आजारावरील लसीच्या मात्रा मोफत पशू वैद्यकीय रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला क्रांतिसिंह नाना पाटील पशु महाविद्यालय साताराचे अधिष्ठाता डॉ विलास आहेर, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. मेश्राम व कर्जत तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अनभुले यांची देखील उपस्थिती होती.
यावेळी बोलत असताना अफवांवर विश्वास न ठेवता काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास या आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यासाठी बाधा झालेल्या जनावरांची इतर जनावरांपासून वेगळी व्यवस्था करावी, चारापाणी इत्यादी वेगळे ठेवावे त्यामुळे इतर जनावरांना होणारा रोगप्रसार थांबवता येईल. हा आजार वासरांमध्ये पण अधिक प्रमाणात दिसून येतो. व विषाणू गोचीड, डास, माशा यांच्या माध्यमातून पसरत असल्यामुळे त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी गोठ्यात वेळोवेळी धुरी कराव्या, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी, गोठा स्वच्छ ठेवण्याबरोबर जनावरांच्या अंगावरील गोचीडांचा नायनाट करणे तितकेच गरजेचे आहे. बाधित जनावरांना वेगळे करून करून योग्य उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. अशा प्रकारे मार्गदर्शन या कार्यक्रमांतर्गत करण्यात आले व लसीचे वितरणही केले गेले.
प्रतिक्रिया
दीड वर्षांपूर्वी जेव्हा लंपी हा रोग आला होता तेव्हा देखील आपण 50 हजार जनावरांना पुरतील एवढ्या लस मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या. आता देखील शासनाकडे या लसीचा तुटवडा असताना व्यक्तिगत प्रयत्न करून बारामती ऍग्रोच्या व कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने 1 लाख जनावरांना पुरतील एवढ्या लस आपण मोफत देत आहोत. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत नुकसान सहन करावे लागू नये यासाठी मी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि यापुढेही करत राहीन.
आमदार रोहित पवार
(कर्जत जामखेड विधानसभा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा