खर्डा :13ऑक्टोबर 2025
खर्डा शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक व लघु व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अखेर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत 14 ऑक्टोबर रोजी सकाळी खर्डा 33 केव्ही सबस्टेशनवर हलगी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, खर्डा येथील 33 केव्ही सबस्टेशनमध्ये कोणतीही मोठी तांत्रिक अडचण नसतानाही वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. वारंवार तारा तुटणे, डीपी फ्युज उडणे, डीपी जळणे अशा समस्यांमुळे दररोज वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील पिठगिरण्या, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, हॉटेल व्यवसाय, व कोल्ड ड्रिंक्स विक्रेते यांना वीज नसल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शिवाय ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा देखील ठप्प होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठीही त्रास सहन करावा लागतो.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी वायरमन व अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करून उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले, मात्र समस्येवर कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, सबस्टेशनचे अधिकारी अनेकदा ठिकाणी अनुपस्थित असतात, त्यामुळे तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद मिळत नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर खर्डा ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले असून 14 ऑक्टोबर रोजी हलगी मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे. या निवेदनाची प्रत खर्डा पोलिस स्टेशनला देखील देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा