खर्डा प्रतिनिधी : १० नोव्हेंबर
खर्डा येथील "राज्य संरक्षित स्मारक"चा दर्जा मिळालेल्या ऐतिहासीक वारसा स्थळांचा तब्बल १४ कोटींचा विकास आराखडा आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व पाठपुराव्यानंतर शासनाकडे सादर करण्यात आला असून राज्य पुरातत्व खात्याच्या नाशिक विभागाच्या सहाय्यक संचालक सौ.आरती आळे यांच्याकडे ही कामे तात्काळ सुरु करण्याची मागणी खर्डा परिसर पर्यटन व तिर्थक्षेत्र विकास कृती समितीचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी केली आहे. या बाबत नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालयास शिष्टमंडळासहनुकतीच भेट देत यासंबंधी विस्तृत चर्चा केल्याची माहिती श्री.गोलेकर यांनी दिली.
राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीखाली "राज्य संरक्षित स्मारक" चा दर्जा असणारे खर्डा येथील ऐतिहासीक भुईकोट किल्ला हे एकमेव वारसा स्थळ होते. मात्र आ.रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर येथील निंबाळकर गढी, निंबाळकर छत्री (सरदार आप्पासाहेब निंबाळकरांची समाधी) व खर्डा शहर व परिसरातील बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असलेले ओंकारेश्वर महादेव मंदिर या स्थळांना ही नव्याने रस्त "राज्य संरक्षित स्मारक" दर्जा मिळाला आहे. या तिन्ही नव्या संरक्षित स्मारकांचा विकास आराखडा अधिक चांगला बनवण्यासाठी आ.रोहित पवार यांनी या क्षेत्रातील दिग्गज असलेल्या देशातील सुप्रसिध्द पुरातन वास्तू व स्थापत्यशैली तज्ञ श्रीमती शिखा जैन(दिल्ली), श्रीमती अर्चना देशमुख (पुणे) यांच्यावर जबाबदारी दिली होती. त्यानुसार त्यांनीही खर्डा येथील या सर्व स्थळांना भेट देत नऊ कोटींचा रूपयांचा विकास आराखडा तयार करत तो शासनाकडे सुपुर्दही झाला. निंबाळकर गढी येथे ऐतिहासीक वस्तूसंग्रहालय उभारणे, तेथील जतन, दुरुस्ती व मजबुतीकरण, सुशोभीकरण, पर्यटकांना सुविधा देणे, निंबाळकर छत्री व ओंकारेश्वर मंदिरात दगडी ब्लॉक्स टाकणे, दुरुस्ती, मजबुतीकरण व सुशोभिकरण, जतन,संवर्धनाची कामे इ. कामे या माध्यमातून शासनाकडे प्रस्तावित आहेत.
ऐतिहासीक भूईकोट किल्ल्याच्या उर्वरीत खंदकाचे पुन:र्जीवन करणे, किल्ल्यात प्रकाशध्वनी योजनेद्वारे (Light and Sound Show) इतिहास कथन, सुशोभिकरण व पर्यटक सुविधा इ. साठीही पाच कोटीचा विकास आराखडा निधी मंजूरीसाठी प्रस्तावाधीन आहे. असा हा एकुण १४ कोटींचा निधी मिळाल्यास खर्डा भागातील पर्यटन विकासास मोठा हातभार लागणार आहे. विशेषत: येथील निंबाळकर गढी ही रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असताना तिथे संस्थेने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय केली होती. जामखेड (जि.नगर), पाटोदा(जि.बीड),भूम,परंडा(जि.उस्मानाबाद) तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या गढीवर शिक्षण घेतले आणि त्यामुळेच या वास्तूवर विशेष,भावनिक प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवाळी सुट्ट्यात विविध बॅच चे माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात, त्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनीही गढीची दुरुस्ती प्राधान्याने करण्याची एकमुखी मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा