महाराष्ट्राचे वैभव असलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ऐतिहासीक भूईकोट किल्ल्यासमोर येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोईसाठी 'जनसुविधा केंद्राच्या' बांधकामास सुरुवात झाली असून त्यासाठी तब्बल एक कोटी वीस लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती खर्डा परिसर पर्यटन व तिर्थक्षेत्र विकास कृती समितीचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी दिली.
राज्यातील संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी प्रथमच जनसुविधा केंद्रांतर्गत उपहारगृह व स्वच्छतागृह गैर सरकारी संस्था(NGO)च्या माध्यमातून बांधण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत पहील्याच टप्प्यात खर्डा किल्ल्यासमोर ही सुविधा मंजूर झाली आहे. सुलभ इंटरनेशनल ही संस्था या बांधकामाचा भार उचलणार आहे.तसेच संबंधित संस्थेकडे या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची पुढील ३० वर्षांची जबाबदारी असणार आहे.
१७९५ साली झालेल्या मराठे निजाम लढाईत मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचा साक्षीदार असलेला हा भूईकोट किल्ला शिर्डी-हैद्राबाद महामार्गालगत असल्याने येथे इतिहासप्रेमी पर्यटकांची गर्दी असते.त्यातच या किल्ल्यासमोर जगातील सर्वात उंच भगवा "स्वराज्य ध्वज" उभारल्याने पर्यटकांची गर्दी वाढली. खर्डा येथे नव्याने विकसित होत असलेले श्री क्षेत्र सितारामगड, संत गितेबाबा समाधी मंदिर ही तिर्थक्षेत्रे, पुरातन व जागृत बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदिरे, इतर ऐतिहासीक वास्तू इत्यादी मुळे धार्मिक व ऐतिहासीक पर्यटनास मोठा वाव आहे. परंतू खर्ड्यासह राज्यातील ५१ गडकिल्ल्यां पैकी एकाही स्मारकावर आत्तापर्यंत स्वच्छतागृहाची सुविधा नसणे हे शासन सर्वत्र स्वच्छता अभियान राबवत असताना पुरोगामी राज्याला शोभणारे नव्हते. विशेषत: महिला पर्यटकांची गैरसोय होत होती. प्रेरणादायी गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याने त्यासाठी त्याठिकाणी स्वच्छतागृहे असणे महत्वाचे आहे.
अर्थात या जनसुविधा केंद्राच्या इमारतीची रचना पुरातत्व खात्याच्या मानदंडानुसार निश्चित करण्यात आली आहे. या इमारतीमुळे किल्ल्याची दृश्यमानता कमी होणार नाही, तेथील ऐतिहासीक व पुरातन वास्तू रचनेचा माहोल बिघडणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. नवीन इमारतीचा रंग, दरवाजा, खिडक्यांची रचना जुन्या स्थापत्यशैली नुसार असणार आहेत तर बाहेरून दगडी टाईल्सचा वापर होणार आहे.
आ.रोहित पवार यांच्या प्रयत्नातून खर्डा येथील निंबाळकर गढी, छत्री(समाधी), ओंकारेश्वर मंदिर यांना एकत्रितरीत्या राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा नव्याने देण्यात आला आहे. पुढील टप्प्यात निंबाळकर गढी लगत असेच जनसुविधा केंद्र उभारले जाणार असल्याची माहितीही विजयसिंह गोलेकर यांनी दिली.
चौकट
भूकंपप्रवण क्षेत्रानुसार या जनसुविधा केंद्राच्या इमारतीचे बांधकाम दोन प्रकारात होणार आहे. पहिल्या प्रकारात खर्ड्यासह ६ स्मारकांच्या ठिकाणी तर दुसऱ्या प्रकारात ५३ स्मारकांच्या ठिकाणी ही इमारत बांधली जाणार आहे.
No comments:
Post a Comment