पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२५एप्रिल
आमदार राम शिंदे "होऊन जाऊ द्या दुध का दुध और पाणी का पाणी" खर्ड्याच्या किल्ल्यावर समोरासमोर चर्चेला या मी पण शासनाकडे पाठपुरावा केलेली कागदपत्रे घेऊन येतो एकदा काय ते लोकांपुढे होऊन जाऊ द्या, खोटे आरोप करणारे व शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्यांना मतदार जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. असा घणाघात आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला.
ते खर्डा येथे जामखेड बाजार समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती सूर्यकांत मोरे, सुरेश भोसले, मंगेश आजबे, संजय वराट, सुधीर राळेभात, विजयसिंह गोलेकर, काका गर्जे, सरपंच आसाराम गोपाळघरे, राजेंद्र पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, मी आमदार झाल्यापासून प्रत्येक कामात प्रामाणिकपणे काम करीत आहे. कागदपत्राचा पाठपुरावा करून कोट्यावधी रुपयांचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणला आहे. तुम्ही तर आमदार झाल्यावर मी आणलेल्या निधीला स्थगिती देण्याचे काम करीत आहात. हे सर्व जनता पाहत आहे. शेतकरी विरोधी भूमिका घेऊन आपण बारामती ऍग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला. मागील निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन बाजार समिती ताब्यात घेतली. पणन मंत्री असताना मार्केट कमिटीसाठी किती निधी आणला, किती विकास केला, गृहराज्यमंत्री असताना कुसडगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र जळगावला कसे गेले होते. खर्ड्याचे पोलीस स्टेशन आपल्या कारकिर्दीत कसे मंजूर झाले नाही. असे प्रश्न उपस्थित केले, मी साधा आमदार असताना पोलीस प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेडला आणले. खर्डा येथे पोलीस स्टेशन मंजूर करून प्रत्यक्षात ते सुरू झाले आहे. खोटे बोलून विकास होत नसतो.
शेतकऱ्यांचा माल साठवणुकीसाठी खर्डा येथे तीन हजार मेट्रिक टनाचे वखार महामंडळाचे गोडाऊन उभे केले आहे. मार्केट कमिटी सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल असेही अश्वासन आ. रोहित पवार यांनी यावेळी दिले. तसेच येणाऱ्या जामखेड मार्केट कमिटीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सहकार व शेतकरी पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास सर्व उमेदवार सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन, संचालक ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी बंधू व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment