खर्डा प्रतिनधी/19ऑगस्ट2025
श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, पूजा-अर्चा आणि आध्यात्मिकतेचा संगम. या पवित्र महिन्यातील चौथ्या सोमवारनिमित्त खर्डा शहरात आर्ट ऑफ लिव्हिंग खर्डा, वैदिक धर्म संस्थान बेंगलोर व श्री मोरेश्वर (मोरप्पा महादेव) मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रूद्रपूजा, कीर्तन आणि महाप्रसादाचा सोहळा पारंपरिक व वैदिक पद्धतीने उत्साहात संपन्न झाली .
खर्डा हे ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेले शहर आहे. येथे जागृत बारा प्रति ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री मोरेश्वर (मोरप्पा महादेव) मंदिर असल्यामुळे परिसरातील भाविकांचे हे केंद्रस्थान ठरले आहे.सोमवारी सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली. बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमातून आलेले पंडितजी व सुजन स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक मंत्रोच्चारात रूद्रपूजा संपन्न झाली. या पूजेचा भाविकांनी मनोभावे लाभ घेतला.भक्तिमय वातावरणात ह.भ.प. बिभीषण महाराज अंदुरे धनेगावकर यांचे ओजस्वी कीर्तन रंगले. या कीर्तनातून श्रावणाचे महत्त्व, शिवभक्तीचे सामर्थ्य व धर्मनिष्ठ जीवनाचा संदेश देण्यात आला. भाविकांनी टाळ्यांच्या गजरात कीर्तनाचा आनंद घेतला.
श्रावण सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. त्यात रूद्रपूजा व कीर्तनाचा संगम झाल्यामुळे भक्तांना दुर्मिळ असा पुण्ययोग साधता आला. धार्मिक भावनेने ओतप्रोत झालेल्या वातावरणामुळे मंदिर परिसरात दिवसभर भक्तिरस पसरला होता.
या सोहळ्यामुळे खर्डा शहर व परिसरातील धार्मिक वातावरण अधिकच पवित्र झाले. वैदिक परंपरा, मंत्रोच्चार आणि कीर्तनाचा संगम झाल्याने श्रद्धाळूंना आध्यात्मिक शांती लाभली. जीवन मंगलमय व समृद्ध करण्यासाठी रूद्रपूजेचे आयोजन अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात, दिनेश चव्हाण, रविकाका कुलकर्णी, बबन नाईक, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, सावता लोखंडे, गणेश जोगदंड, प्रकाश सोनटक्के, नितीन राळेभात, जयदीप पिंगळे, धनसिंग साळुंखे, संतोष सुरवसे, रमेश घुले, अवी पिंगळे, रवी पिंगळे, गणेश पिंगळे, बळीराम सुरवसे, अशोक गोलेकर, गोवर्धन पिंगळे, बिभीषण सुरवसे, गौतम गोपाळघरे, वैशाली थोरात, जयश्री जोगदंड, मनीषा कुलकर्णी, भाग्यश्री राळेभात, अशोक खामकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.श्रावणातील पुण्यप्राप्तीचा हा अद्वितीय सोहळा खर्डा शहरात मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.
किर्तन व रुद्र पूजेनंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. स्त्री-पुरुष, लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला. महिलांची विशेष उपस्थिती या सोहळ्यात ठळकपणे दिसून आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा