आहिल्यानगर प्रतिनिधि/१९ऑगस्ट२०२५
औरंगाबादमध्ये छावा संघटनेच्या शहरप्रमुखाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. 19 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सचिन पुंडलिक औताडे (वय 32) यांचा खून प्रेमसंबंधातील वादातून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
बेपत्ता प्रकरणाचा उलगडा
31 जुलैपासून औताडे बेपत्ता असल्याची तक्रार हर्सूल पोलिसांत दाखल होती. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध घेत असतानाच 12 ऑगस्ट रोजी आहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात गोदावरी नदीपात्राजवळ अज्ञात मृतदेह सापडला. तपासानंतर हा मृतदेह औताडे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
कसा झाला खून?
पोलिस तपासानुसार, आरोपी दुर्गेश मदन तिवारी आणि भारती रवींद्र दुबे यांनी सचिन औताडे यांना भेटण्यासाठी बोलावले. तिथे झालेल्या वादामुळे त्यांनी अफरोज खान या साथीदाराच्या मदतीने सचिनचा गळा चिरून खून केला. त्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
खुनामागे कारण:
सचिनने प्रेयसीसोबत विवाह करण्यास नकार दिल्यानेच ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मृताचे भाऊ राहुल पुंडलिक औताडे यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तिवारी, दुबे आणि खान यांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे औरंगाबादसह परिसरात मोठा धक्का बसला आहे. प्रेमसंबंधातून घडलेल्या या हत्येमुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस पुढील तपास करत असून, गुन्ह्यात इतर कोणी सहभागी होते का याचा शोध सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा