जामखेड प्रतिनिधी/५ऑक्टोबर२०२५
जामखेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतन, राहणीमान भत्ता आणि भविष्य निर्वाह निधी थकबाकीची रक्कम तत्काळ देण्याची मागणी करत सोमवार, दि. ६ ऑक्टोबरपासून जामखेड पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनतर्फे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, प्रत जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती जामखेड, पोलीस स्टेशन तसेच तहसीलदार कार्यालयास देखील माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.या निवेदनावर युनियनचे अध्यक्ष वसंत जायभाय, उपाध्यक्ष त्रिंबक पाचारणे, तालुका कार्याध्यक्ष दादा महारनवर आणि तालुका सचिव नानासाहेब साठे यांच्या सह्या आहेत.कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, कोविड काळातील प्रोत्साहनपर मानधन म्हणून शासनाने दर महिन्याला १००० रुपये प्रमाणे २३ महिन्यांचे २३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले असतानाही ग्रामपंचायत अधिकारी ही रक्कम अद्याप कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. ही रक्कम तातडीने कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, अशी त्यांनी आग्रहाची मागणी केली आहे.
प्रमुख मागण्या;
२००७ पासून राहणीमान भत्ता मिळालेला नाही; तो तत्काळ देण्यात यावा.थकीत राहिलेला भविष्य निर्वाह निधी (ग्रामपंचायत हिस्सा ८.३३%) देण्यात यावा.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान २५% ते ५०% दरमहा वेतन जमा करण्यात यावे.कोविड काळात केलेल्या कामासाठी शासन निर्णयानुसार २३ महिन्यांचे २३ हजार रुपये प्रोत्साहन मानधन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे.
कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे की, या मागण्या पूर्ण न केल्यास सोमवारपासून सर्व कर्मचारी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा