पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२२ जून
अतिवृष्टी, वादळ, पुर, पावसाचा ऐनवेळी पडणारा खंड, पिक काढणी पश्चात होणारे नुकसान अश्या नैसर्गिक संकटामुळे होणाऱ्या नुकसानामुळे अडचणीत सापडणाऱ्या शेतकऱ्यांना यातून बाहेर काढून दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने सर्वसमावेशक अशी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू आहे. त्या योजनेतून खरीप हंगाम २०२४-२५ या वर्षांसाठी पिक विमा भरण्याचे काम सुरू आहे. त्याच अनुषंगाने आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कोणीही शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहु नये व विमा न भरल्यामुळे होणारे नुकसान टाळले जावे यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी आपल्या दोन्ही तालुक्यांतील संपर्क कार्यालये व जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अश्या तिन्ही ठिकाणी मोफत पिक विमा भरण्याची व्यवस्था केली आहे. तरी कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या सोईच्या ठिकाणी जाऊन आपला पिक विमा भरावा असे आवाहन जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.
अलिकडील काळातील पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे कधी नुकसान होईल हे सांगता येत नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीतून दिलासा मिळावा यासाठी शासनाच्या वतीने विम्याचा लाभ दिला जातो. याही वर्षी शेतकऱ्यांना १ रूपयात पिक विमा देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यावर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शासनाने सोयाबीन, बाजरी, तुर, मुग, कपाशी, उडीद, कांदा,मका, भुईमूग या पिकांना विमा संरक्षण दिले असून पिक विमा भरण्यासाठी हेक्टरी एक रूपया एवढी विमा हप्ता रक्कम पुढीलप्रमाणे आहे. विमा संरक्षित पिके व विमा रक्कम.. सोयाबीन ५४,००० /- बाजरी ३३,९१३/-, मुग २०,०००/-, तुर ३६८०२/-, कपुस ५९,९८३/-, भुईमूग ३८,०००/-, उडीद २०,०००/-, मका ३५,५९८/- व कांदा ८०,०००/- ज्वारी ३०,००० /- ईतकी हेक्टरी विमा संरक्षित रक्कम निश्चित केली आहे. पिक विमा भरण्यासाठी सातबारा उतारा ८अ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड व पिक पेरा स्वयं घोषणापत्र, झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक असून पिक विमा भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ आहे. <br> कर्जत तालुक्यासाठी आ. प्रा.राम शिंदे जनसंपर्क कार्यालय बाजारतळ कर्जत, ता. कर्जत तर जामखेड तालुक्यासाठी आ. प्रा.राम शिंदे जनसंपर्क कार्यालय पंचायत समिती कार्यालया समोर जामखेड व कृषी उत्पन्न बाजार समिती बीड रोड जामखेड या ठिकाणी मोफत पिक विमा भरण्याची व्यवस्था करण्यात आली असून शेतकऱ्यांनी या ठिकाणी जाऊन आपला पिक विमा भरावा व नैसर्गिक आपत्तीमुळे आपले होणारे आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment