खर्डा प्रतिनधी/२०सप्टेंबर२०२५
कर्जत-जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि सौ. सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा येथे सुरू असलेली शिवपट्टण ग्रामोद्योग संस्था आज अल्पावधीतच आपली वेगळी छाप पाडत आहे. येथील महिलांनी तयार केलेल्या उच्च दर्जाच्या टॉवेल आणि जॅकेट्सची मागणी दिवसेंदिवस वाढत असून सामाजिक व वस्त्रोद्योग क्षेत्रातील जाणकार मंडळी संस्थेस भेट देत आहेत.
अशीच एक अभिमानास्पद भेट म्हणजे मुंबईतील उच्चभ्रू फोर्ट परिसरात दरवर्षी होणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या 'कालाघोडा फेस्टिव्हल'च्या संस्थापक संचालिका गीता कैस्टेलिनो यांची! त्यांनी अलीकडेच खर्ड्यातील शिवपट्टण ग्रामोद्योग विकास संस्थेस भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेतली व संस्थेच्या कामाचे भरभरून कौतुक केले. शिवाय संस्थेत तयार होणाऱ्या टॉवेल व जॅकेट्सच्या विक्रीसाठी येत्या कालाघोडा फेस्टिव्हलमध्ये स्टॉल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता विजयसिंह गोलेकर, संचालिका सौ. सुरेखा चावणे, सचिव श्रीकांत बावडेकर, सचिन खलाटे, प्रशिक्षक बसवराज जोजन, आकाश सावलकर, व्यवस्थापक अशोक खटावकर, संचालक विजयसिंह गोलेकर, शशिकांत गुरसाळी, सलमान आतार, रामहरी गोपाळघरे, बंडूशेठ चावणे, सहाय्यक अर्जून भारती आदी उपस्थित होते.
शिवपट्टण' ब्रॅण्डचा होणार देशविदेशात प्रचार*
ऐतिहासिक खर्डा शहराला पूर्वी ‘शिवपट्टण’ नावाने ओळखले जात होते. याच ऐतिहासिक नावावरून येथे निर्मित होणाऱ्या कापडाला ‘शिवपट्टण’ हा ब्रॅण्ड नेम देण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात पुण्यातील भिमथडी जत्रा, बारामतीतील कृषक कृषी प्रदर्शन तसेच जानेवारी महिन्यात मुंबईतील कालाघोडा फेस्टिव्हलमध्ये विक्री व प्रदर्शनासाठी स्वतंत्र स्टॉल मिळणार आहे. यामुळे ‘शिवपट्टण’ ब्रॅण्ड देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचणार असून खर्डा व परिसरासाठी हे भुषणावह ठरणार आहे.*ग्रामोद्योगाला मिळणार योग्य बाजारपेठ*
साधारणपणे ग्रामोद्योगातून तयार होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवणे हे अवघड काम असते. मात्र, सुनंदाताई पवार यांच्या नियोजन व मार्गदर्शनामुळे शिवपट्टण संस्थेला योग्य प्लॅटफॉर्म मिळत आहे. याबद्दल येथील कामगार महिला समाधान व्यक्त करीत आहेत.
*महिलांचा आत्मविश्वास – "आम्ही आव्हान पेलणार!"*
संस्थेतून होणारी किरकोळ विक्री, बारामतीतील शारदानगर येथील शिक्षण संस्थेकडून होणारी खरेदी तसेच विविध प्रदर्शनांमधील वाढती मागणी लक्षात घेता उत्पादनाचा आवश्यक साठा तयार करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र, हे आव्हान महिलांनी आनंदाने स्वीकारले असून, प्रसंगी शिफ्ट वाढवून उत्पादन वाढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर लवकरच आवश्यक ती यंत्रसामग्री वाढविण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने पाऊल उचलले आहे.
येथे प्रशिक्षण घेऊन कायमस्वरूपी रोजगाराची संधी असल्याने खर्डा व परिसरातील गरजू पुरुष व महिलांनी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा