कर्जत-जामखेड, दि.१६ : सप्टेंबर
कर्जत-जामखेड मतदारसंघातील आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांतील प्रलंबित तसेच सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी आमदार रोहितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत आणि जामखेड पंचायत समित्यांच्या वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये मतदारसंघातील विविध सरकारी कार्यालयांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात येणार आहे.
कर्जत पंचायत समितीची आमसभा गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिवपार्वती मंगल कार्यालय, कर्जत येथे पार पडणार आहे, तर जामखेड पंचायत समितीची आमसभा शुक्रवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज लॉन्स, जामखेड येथे होणार आहे. या दोन्ही आमसभांमध्ये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, २०२५-२६ या वर्षासाठी करावयाच्या नव्या योजनांचे नियोजन निश्चित केले जाणार आहे. यामध्ये ग्रामविकास, शेतीसंबंधित उपक्रम, पायाभूत सुविधा उभारणी, शिक्षण व आरोग्य सेवांचा दर्जा उंचावणे यासह सध्या सुरु असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शासकीय कामकाजाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांचाही आढावा घेण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत झालेल्या नसल्याने या दोन्ही पंचायत समित्यांचे कामकाज प्रशासक म्हणून बीडीओ यांच्याकडे देण्यात आलेले आहे. त्यामुळे विकास कामांचा आढावा घेणे आणि प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांच्या अडकलेल्या कामांचा निपटारा करणे यासाठी या आमसभांना मोठे महत्त्व आहे. या आमसभेला थेट आमदार स्वतः उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाकडून आमसभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. नागरिकांच्याही अडकलेल्या प्रश्नांवर या आमसभेत चर्चा होऊन ते सोडवण्यास मदत होणार आहे. या सभांमध्ये संबंधित विभागाचे अधिकारी, पंचायत समितीचे मा. सदस्य, स्थानिक पदाधिकारी व नागरिक सहभागी होणार आहेत. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य सुर्यवंशी आणि जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी सर्व संबंधित सदस्य, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून रचनात्मक सूचना व मते नोंदवावीत, असे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा