जामखेड प्रतिनधी/17 सप्टेंबर2025
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज,दि. १७ सप्टेंबर रोजी जामखेड तालुक्यातील चोंडी, देवकर वस्ती आणि आघी या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे या भागात शेतजमिनी, पिके, जनावरांचे गोठे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष बाब म्हणजे चौंडी येथील ऐतिहासिक शिल्पसृष्टी बुरुजासही या पुरामुळे फटका बसला असून, चौंडी गावातील पुलावर तब्बल ७ ते ८ फुट पाणी साचलेले पाहायला मिळाले. या परिस्थितीमुळे अनेक घरांत व गोठ्यांत पाणी घुसून नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य, पीक व जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे.सभापती यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेतल्या. अतिवृष्टीमुळे नागरिकांना भेडसावत असलेल्या दैनंदिन अडचणी आणि यातना प्रत्यक्ष अनुभवल्याचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले. प्रशासनाला त्वरित पावले उचलण्याचे निर्देश देत, दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच, गावातील तुटलेले रस्ते, पडझड झालेल्या शाळा आणि बंधारे तसेच इतर पायाभूत सुविधा दुरुस्त व पुनर्बांधणी करण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश दिले आहेत.यासोबतच, शासकीय स्तरावरून मदत मिळेल यासाठी सविस्तर पंचनामे करताना कोणतीही गरजवंत व्यक्ती किंवा शेतकरी यांचा वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना सुध्दा प्रशासनाला करण्यात आली आहे.संपूर्ण चोंडी, देवकर वस्ती, आघी परिसरात झालेल्या पुरामुळे पिकांचे, घरांचे, शाळांचे आणि शेतजमीनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच, काही मालमत्तेचा अक्षरशः पुरात वाहून गेले आहे. संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविला जाणार असल्याचेही सभापतींनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा