खर्डा दिनांक : २० डिसेंबर
सौ सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून भीमथडी फाउंडेशन बारामती, एटीडी बारामती, आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे येथील भीमथडी जत्रेसाठी खर्डा शहरातील ८ महिला बचतगटांसहित जातेगाव व दिघोळ येथील अनेक महिला व पुरुष जत्रेसाठी रवाना झाले आहेत.
राज्यातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपल्या संसारास हातभार लावता यावा यासाठी बारामती ॲग्रोच्या विश्वस्त व आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून भीमथडी फाउंडेशन बारामती, एटीडी बारामती, आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत ५ दिवसीय भीमथडी जत्रेचे आयोजन कृषी महाविद्यालय (सिंचननगर) शिवाजीनगर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
या भीमथडी जत्रेसाठी खर्डा येथील सौ. सुनंदाताई पवार महिला बचत गट, राणी पद्मावती महिला बचत गट, दीपज्योती महिला बचत गट, वैष्णवी महिला बचत गट,भरारी महिला बचत गट, चौंडेश्वरी महिला बचत गटातील ३ महिला बचत गट,सावित्रीबाई फुले महिला बचत गट व विकास महिला बचत गट येथील असंख्य महिला व पुरुषांनी यासाठी सहभाग घेऊन उद्यापासून सुरू होणाऱ्या भीम थडी जत्रेसाठी सर्व महिला बचत गट रवाना झाले आहेत.
गेली १८ वर्षापासून या भीमथडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून आजपर्यंत लाखो बचत गटांना या यात्रेच्या व व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक फायदा झाला आहे या भीमथडी जत्रेला पुणेकरांसहित महाराष्ट्रातील लाखो लोक भेट देऊन बचत गटांच्या वस्तू खरेदी करून व शाकाहारी व गावरान मांसाहारी जेवणाचा मनसोक्त आनंद घेतात. दरवर्षी या यात्रेला वाढता प्रतिसाद पाहता महिला बचत गटांची कोट्यावधी रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत असते.
येथील भीम थडी जत्रेचे काटेकोरपणे नियोजन करण्यात येत असून पुणे शहरासहित महाराष्ट्रातील व परराज्यातील लाखो महिला व पुरुषांची जत्रेसाठी उपस्थिती असते.ज्या लोकांना शक्य आहे अशा सर्वांनी आपल्या कुटुंबासहित भीम थडी जत्रेसाठी येण्याचे आवाहन बारामती अग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या अध्यक्ष सुनंदाताई पवार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment