जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प्रत्यक्षदर्शी मोहसिन पठाण यांनी पाहिले. त्यांनी लगेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना कळवले. कोठारी यांनी तात्काळ आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्या व्यक्तीच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसत होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोठारी यांनी त्याला जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी तपासणी करून त्या व्यक्तीस मृत घोषित केले.
सदर प्रकरणाची माहिती कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली. त्यानुसार पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण इंगळे करत असून, पोलीस नाईक जितेंद्र सरोदे यांनी मदत केली.
घटनेदरम्यान ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था स्पष्ट झाली. हे रुग्णालय शहराबाहेरील भागात स्थलांतरित केल्यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच शवविच्छेदन गृहात मृतदेह नेल्यानंतरही तो उतरवण्यासाठी कोणताही शासकीय कर्मचारी उपस्थित नव्हता. शेवटी पोलीस नाईक सरोदे यांच्या सहकार्याने मृतदेह ठेवण्यात आला.
या संदर्भात संजय कोठारी म्हणाले, "मी नेहमीप्रमाणे मोफत सेवा करतो, परंतु सरकारी यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव गंभीर समस्या ठरत आहे. रुग्णालय, पोलीस ठाणे आणि शवविच्छेदन खोली वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने प्रक्रिया पूर्ण करण्यास दोन तासापर्यंत वेळ जातो."
संजय कोठारी यांच्यासोबत तुषार जगदाळे, अमजद शेख, सिद्धी सय्यद, मच्छिंद्र वायफळकर, महेश अवसरे आदींनी मदत केली. स्थानिक नागरिकांनी दाखविलेला सहकार्यभाव कौतुकास्पद ठरला.
सदर घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा