खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025
नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावरून २५ वर्षीय तरुणीने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती जामखेडमध्ये घडली की काय अशी चर्चा जामखेड तालुक्यात सुरू आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली नाना उगले (वय २५) हिचा विवाह सुमारे आठ वर्षांपूर्वी जामखेड तालुक्यातील नायगाव येथे झाला होता. विवाहानंतर दीड वर्ष सुखाने संसार झाल्यानंतर पती नाना प्रकाश उगले आणि सासरे प्रकाश पंढरीनाथ उगले यांनी तिला माहेरी येऊ न देता वारंवार पैशांची मागणी करून त्रास देण्यास सुरुवात केली.
तक्रारदार शिवाजी श्रीरंग सकुंडे रा. राळेसांगवी पोस्ट पाटसांगवी ता.भूम जि.धाराशिव असलेल्या रूपालीच्या वडिलांनी सांगितले की, याआधी २ लाख रुपये जावयाच्या मागणीनुसार दिले होते; मात्र गेल्या दोन वर्षांत आणखी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.दरम्यान, ननंद मनिषा शिवाजी टाळके आणि नंदावा शिवाजी गोरख टाळके यांनीही संसारात ढवळाढवळ करून रूपालीला पतीचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी वारंवार दिल्याचे सांगितले जाते.या सततच्या छळाला कंटाळून, दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी सुमारे सायं. ५.३० च्या सुमारास रूपालीने मुलगा समर्थ (वय ६) आणि मुलगी साक्षी (वय ४) यांच्यासह घराजवळील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.
खर्डा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा