पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१८ जुलै
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास कृती समितीच्या पाठपुराव्यामुळे पुरातत्वचे अधिकारी व तज्ञ संस्थेचे विशेषज्ञ यांच्या संयुक्त समितीने 'राज्य संरक्षित स्मारक' असलेल्या वारसा स्थळांना भेट देत पाहणी केली. प्राथमिक अहवाल सादर होताच लवकरच सविस्तर अंदाजपत्रके तयार होतील अशी माहिती समितीचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी दिली.
पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाच्या नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, द्रोणाह च्या भूदृश्य वास्तूकलातज्ञ (लॅण्डस्केप आर्किटेक्ट) रितू शर्मा, भारतीय विद्या अभ्यासक तथा हस्तलिखित संरक्षक अनिता जोशी, संवर्धन वास्तूविशारद (कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट) चैतन्य वर्मा यांच्या तज्ञ समितीने याठिकाणी भेट देत पाहणी केली.
खर्डा शहरातील मध्यवस्तीत 'राज्य संरक्षित स्मारक' असलेल्या निंबाळकर गढी, समाधी (छत्री), बारव व ओंकारेश्वर शिवमंदिराची पाहणी करत आवश्यक तिथे मोजणी तसेच छायाचित्रे ही घेतली. यानंतर पुढील उपाययोजनांवर चर्चा करत प्राथमिक कृती अहवाल तयार केला. खर्ड्याच्या सांस्कृतिक वैभवाचे कौतुक करत विशेषत: निंबाळकर गढीच्या सद्यस्थिती बद्दल चिंता व्यक्त केली. गढी व छत्रीच्या जतन व संवर्धनासाठी अगोदर या वास्तूंचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करणे गरजेचे असल्याचे समितीचे एकमत झाले. या परीक्षणाद्वारे बांधकामाची आजमितीची गुणवत्ता तपासणे, त्याच्या सद्यस्थितीच्या क्षमतेचे विश्लेषण करणे, इमारतीचे आयुष्य वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवणे ही कामे होतील.
यावेळी निंबाळकर गढीच्या पडझडीची व सद्यस्थितीची बाहेरुन चारही बाजूंनी पाहणी करत परिसरातील काही रहिवाशांच्या घरी जात त्यांच्याशी संवाद साधला. ऐन मध्यवस्तीत ही भव्य व उंच इमारत आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या जिवीताला व घरांना तसेच वाटसरुंना धोकेदायक असल्याबाबत समितीला खात्री झाली. त्यामुळे गढीच्या बाहेरील तटबंदी व बुरुजांचे बांधकाम, दुरुस्ती व मजबुतीकरण प्राधान्याने सुचविण्यात येणार असल्याचे समितीच्या सदस्यांनी ठरवले. नंतर टप्प्याटप्प्याने गढीच्या आतील बाजूस आवश्यक तिथे बांधकाम, धोकेदायक भिंती पाडणे, वस्तूसंग्रहालय उभारणी, बाग बगिचा व सुशोभीकरण आदी कामे होतील असा प्राधान्यक्रम आराखड्यात असणार आहे.
सध्या प्राधान्याने गढीच्या कामासाठी निधी मागणी करण्यात येणार असली तरी, या सर्व वारसा स्थळांचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.
आराखड्यात या वारसा स्थळांचे बांधकाम,रचना यांसह अनेक बाबींचा विचार करण्यात येणार असल्याने त्याप्रमाणे पाहणी करण्यात आली. त्यानुसार गढीच्या व ओंकारेश्वर शिवमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातील भव्य लाकडी दरवाजे, मंदिरातील गाभाऱ्याचा दरवाजा तसेच इतर दरवाजे व खिडक्या इत्यादी लाकडी वस्तूंना ओल, प्रकाश, कृमी कीटक यापासून संरक्षण(कॉन्झर्वेशन), परिरक्षण(प्रिझर्वेशन) व पुन:स्थापण(रिस्टोरेशन) करण्यासाठी उपाययोजना सूचविण्यात येणार आहेत.
मंदिरातील पुरातन धातूंच्या मुर्तींवर रासायनिक व विद्युत रासायनिक प्रक्रिया करून त्यांची झळाळी वाढविण्यात येणार आहे. मंदिर,बारवा, छत्री परिसरातील दगडी मुर्त्या सुस्थितीत असून भविष्यात त्यांच्या संवर्धनाची उपाययोजना ग्राह्य धरण्यात येणार आहे. बारमाही पाणी असलेल्या गढी व छत्री येथे पाण्याचे कारंजे, त्यावर तसेच मंदिर,बारवा, छत्री व गढीवर विद्युत प्रकाश योजना आदींचा अंतर्भाव असणार आहे. छत्रीच्या छतावरुन पडलेले १२ मिनार व इतर शिल्प रचना दुरुस्ती, सुशोभीकरण, मारुती मंदिर ते ओंकारेश्वर मंदिर दरम्यान असलेल्या कौतुका नदीवर नवीन पूल उभारणी, गढी ते मंदिर पर्यंतचा पक्का रस्ता, नदीघाट बांधणे, मंदिराच्या शिखरावरील शिल्प व मुर्त्यांचे संरक्षण करणे, रंगरंगोटी काढून स्मारकाला मूळ स्वरूप प्राप्त करून देणे आदी कामांचा एकत्रित विकास आराखडा व सविस्तर अंदाजपत्रके लवकरच सादर केले जाणार असल्याचे समितीने आश्वस्त केले असल्याची माहिती श्री.गोलेकर यांनी सांगितले.
चौकट
खर्डा येथील या ऐतिहासिक स्थळांना 'राज्य संरक्षित स्मारक'चा दर्जा आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रयत्नातून मिळाला तसेच त्यांच्या पाठपुराव्यामुळे विकास आराखडा ही तयार करण्यात आला.आता यासाठी लागणारा मोठा निधीसाठी त्यांच्याच माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
_विजयसिंह गोलेकर, तालुकाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, जामखेड
No comments:
Post a Comment