जामखेड प्रतिनिधी २६ नोव्हेंबर
कुकडी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना वाट पहावी लागत आहे आणि हा विषय प्रलंबितच आहे. परंतु आता कर्जत तालुक्यातील देशमुखवाडीतील २०.३० हेक्टर जमिनीसाठी ५ कोटी १९लाख ७७ हजार ८२८ रुपये एवढी भूसंपादनाची रक्कम मंजूर झाली असून जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या काही दिवसातच त्याचे वाटप देखील सुरू होणार आहे.
कुकडीच्या भूसंपादनाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कुकडी कालव्यासाठी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनीचे भूसंपादन केले परंतु अनेक वर्षे या भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनीही याबाबत पाठपुरावा केल्याचे दिसले नाही. मात्र रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर याबाबत सातत्याने जलसंपदामंत्री आणि अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, वेगवेगळ्या भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत सातत्याने बैठका घेऊन भूसंपादनातील अडचणी सोडवून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करुन कोरोनाकाळात राज्याचे महसूली उत्पन्न घटले असतानाही त्यांनी तब्बल १०० कोटींहून अधिक मोबदला शेतकऱ्यांना मिळवून दिला. याशिवाय रोहित पवार हे आमदार होण्यापूर्वी भूसंपादनाचे केवळ २ कोटी ९० लाख रुपयेच शेतकऱ्यांना मिळाले होते.
आता कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी परिसरातील जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५.१९ कोटी रुपये मंजूर झाले असून आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांकडून मागवण्यात आली आहेत. येत्या आठवड्यापासून त्याच्या वाटपाला देखील सुरुवात होणार आहे. दरम्यान, कुकडी कालव्यासाठी केलेल्या भूसंपादनाचा मोबदला अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तोही मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न सुरुच आहेत. भूसंपादनाचा मोबदला देताना वेगवेगळ्या कार्यालयात असलेले प्रस्ताव एकत्रित करणे, शेतकऱ्यांची संमती मिळवणे, शोध अहवाल घेणे, जिल्हा मूल्यांकन समितीकडे दर निश्चितीसाठी प्रस्ताव सादर करणे, पंचनामा, खरेदीखत अशी अत्यंत क्लिष्ट प्रक्रीया पार पाडावी लागते. ही प्रक्रिया सुलभ करुन शेतकऱ्यांना तातडीने भूसंपादनाचा मोबदला मिळावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री यांची रोहित पवार यांनी भेट घेतली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन भूसंपादनाचा मोबदला देताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत चर्चा देखील झाली होती.
कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी कुकडी कालवा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु कालवा झाल्यापासून याची दुरुस्ती किंवा गेटची दुरुस्तीही करण्यात आली नव्हती. आमदार रोहित पवार यांनी सुमारे ३५० कि.मी. चाऱ्यांची स्वच्छता करुन २२० नवीन गेट बसविले. तसेच येडगावपासून कर्जतपर्यंत कालव्यातील दगड काढून खोलीकरणाचे काम देखील पूर्ण केले.
प्रतिक्रिया
गेल्या अनेक वर्षांपासून कुकडी कालव्यात जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळत नव्हता. परंतु, महाविकास आघाडी सरकारच्या सहकार्याने १०० कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना मी मिळवून दिले आणि उर्वरित शेतकऱ्यांनाही मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यावेळी केलेल्या पाठपुराव्याचा टप्प्याटप्प्याने देशमुखवाडीसारख्या अनेक गावातील शेतकऱ्यांना आता फायदा होत असल्याचे पाहून मनापासून आनंद वाटतो.
- आमदार रोहित पवार
(कर्जत जामखेड विधानसभा)
No comments:
Post a Comment