जामखेड प्रतिनिधी : २० डिसेंबर
जामखेड नगरपरिषदेला अहमदनगर जिल्ह्यात घरकुल योजनेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. गोर गरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी घरकुल योजनेबाबत प्रभावी अंमलबजावणी त्याचेच फलित म्हणून जामखेड नगरपरिषद जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा योग्य ताळमेळ असेल तर काय होते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. या गौरवास्पद कामगिरीमुळे जामखेडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शहरातील नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधून, विविध सरकारी योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी रोहित पवार कायमच प्रयत्नशील असतात. यातूनच पंतप्रधान आवास योजने संदर्भात प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन वेळोवेळी प्रश्न मार्गी लावण्यात आले. आ. रोहित पवार यांनी वेळोवेळी नागरिक आणि अधिकारी यांच्या संपर्कात राहून व शासकिय पातळीवर केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला होता. नागरिकांना घरकुलामध्ये कोणती अडचण येऊ नये म्हणून प्रती घरकुल एक हजार रुपये प्रमाणे खासगी आर्किटेक्चरची नेमणूक देखील करण्यात आली होती. राज्यामध्ये असे करणारी जामखेड ही पहिलीच नगरपरिषद असावी.
जामखेड नगरपरिषदेमध्ये पंतप्रधान आवास योजना अंतर्गत एकूण ७३९ घरकुले मंजूर झालेली आहेत, यातील ५३९ घरांचे काम सुरू झाले आहे. ३२८ घरकुलांची कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आलेली असून दुसऱ्या डीपीआरमध्ये २०५ घरकुले मंजुर झाली आहेत. पहिल्या डीपीआरमधील मंजूर असलेल्या घरकुलांसाठी अडीच लाखांपैकी २ लाख २० हजारांचे अनुदान प्राप्त झालेले आहे. तसेच दुसऱ्या डीपीआरमधील २०५ पैकी १८९ लाभार्थ्यांना प्रती घरकुल एक लाख रूपयांचे अनुदान प्राप्त झालेले आहे. यातील उर्वरित १६ लाभार्थ्यांना लवकरच अनुदान प्राप्त होणार आहे. त्यामुळे 'जामखेड'करांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचं या माध्यमातून स्पष्ट होत आहे.
सन २०२१-२२ ची जामखेड तालुक्यातील घरकुल उभारणीची आकडेवारी पाहिली तर एकूण २१७३ घरकुल लाभार्थ्यांना मंजूर असून त्यापैकी तब्बल ६१५ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे व १५५८ घरकुलाचे काम सध्या सुरू आहे. मागच्याच वर्षी जामखेडचा विभागीय स्तरावर दुसरा क्रमांक देखील आला होता. त्यामुळे ही आकडेवारी पाहिली तर नक्कीच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मतदारसंघातील प्रत्येक पात्र लाभार्थी कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी स्थानिक आमदार रोहित पवार व प्रशासकिय अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न आणि सहकार्य करत आहेत.
प्रतिक्रिया..
मतदारसंघातील प्रत्येक पात्र नागरिकाला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी मी कायमच प्रयत्न करत असतो. त्यानुसार मतदारसंघातील कोणताही पात्र लाभार्थी घरकुलाच्या योजनेपासून वंचित राहू नये, ही माझी पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे. आता घरकुल योजनेत जिल्ह्यात अव्वल स्थान जामखेड नगर परिषदेने मिळवले ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. मी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
- रोहित पवार
(आमदार, कर्जत - जामखेड)
No comments:
Post a Comment