जामखेड प्रतिनधी-१७ डिसेंबर
कर्जत-जामखेड मतदारसंघांतील युवांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी ‘साहेब चषक २०२२’ ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जामखेडमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन तर कर्जतमध्ये बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेटपटू कृष्णा सातपुते, अक्षय तावरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जत-जामखेड मतदारसंघात श्री शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून दरवर्षीच विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यामध्ये आरोग्य शिबीरे, महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचा समावेश आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रिकेट प्रेमींसाठीही त्यांनी 'साहेब चषक' या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन तर मिळेलच पण भविष्यात क्रिकेटपटू म्हणून उदयास येणाऱ्या अनेक उभरत्या खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा आमदार रोहित पवार यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
जामखेड शहरातील बीड रोडवर असलेल्या ‘शंभूराजे क्रिकेट क्लब’च्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जामखेड तालुक्यातील अनेक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून क्रिकेटप्रेमींनीही या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला आहे. आमदार रोहित पवार यांच्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत साहेब चषक स्पर्धेचा शुक्रवारी उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर स्पर्धेतील चुरस पहायला मिळाली. यावेळी उपस्थित असलेले आंतरराष्ट्रीय पातळीवरील टेनिसबॉल क्रिकेटपटू कृष्णा सातपुते यांनी उद्घाटनाच्या सामन्यात एकाच षटकात पाच षटकार लगावत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी उपस्थित खेळाडूंमध्ये असलेला उत्साह पाहून प्रेक्षकांमध्येही एक वेगळीच ऊर्जा संचारली होती. अगदी स्पर्धेच्या सुरवातीलाही चुरशीचे सामने पहायला मिळाले.
कर्जत तालुक्यासाठीच्या स्पर्धेचे बक्षीस वितरणही केदार जाधव आणि आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. शिरुर येथील यशवंत भाऊ पाचंगे यांच्या ‘शिरुर एलेवन’ संघाने ‘साहेब चषक २०२२’ पटकावला तर मिरजगावच्या छत्रपती जिनींगचा ‘बारामती एंगर्स’ हा संघ उपविजेता ठरला. कडा येथील ‘स्पीड एलेवन’ संघाने तृतिय तर खेड येथील सतीश काका मोरे प्रतिष्ठानच्या संघाने चौथे पारितोषिक पटकावले. या सर्व संघांना केदार जाधव आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. पुढील वर्षी यापेक्षाही भव्य स्पर्धा भरविण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
चौकट
‘‘आदरणीय श्री शरद पवार साहेबांचा वाढदिवस दरवर्षीच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. ‘साहेब चषक’ स्पर्धाही त्याचाच एक भाग आहे. या स्पर्धेमुळे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि एक व्यासपीठही मिळते. यातूनच भविष्यात अनेक खेळाडू जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकले तर माझ्यासाठी ती सर्वांधिक समाधानाची बाब असेल. भविष्यातही नियमित असे उपक्रम राबविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.’’
रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)
No comments:
Post a Comment