जामखेड प्रतिनधी-२४जानेवारी
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन केंद्रीय युवा कामकाज व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आहे. या भेटीत मतदारसंघात युवा वसतिगृह उभारणे तसेच ॲथलेटिक्सच्या बाबतीत पायाभूत सुविधा उभारण्याबाबत त्यांनी मंत्रिमहोदयांशी सकारात्मक चर्चा करून विनंती केली आहे.
युवा वसतिगृहे हा केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम असून ते तरुणांना देशांतर्गत प्रवासाला चालना देण्यासाठी बांधले जात आहेत. तसेच सहली किंवा अभ्यास दौऱ्यावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुण गटांना कमी खर्चात निवास आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे व धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत. अशातच असे युवा वसतिगृह कर्जत-जामखेड मतदारसंघात उभारण्यात आले तर या परिसरातील माहिती ही नव्या पिढीतील युवकांना होईल आणि या भागाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचेल या उद्देशाने युवा वसतिगृह मतदारसंघात उभारण्यात यावे, अशी विनंती मंत्री अनुराग ठाकूर यांना भेटून केल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
यासोबतच ग्रामीण भागातून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात खेळाडू पुढे येत आहेत आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. अशातच कर्जतला महिलांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पार पडली. जी अत्यंत सुंदर पद्धतीने नियोजन करून घेण्यात आली पण शेवटी पायाभूत सुविधा या तात्पुरत्या स्वरूपात उभाराव्या लागल्या होत्या, जर कायमस्वरूपी चांगल्या पायाभूत सुविधा असतील तर अशा स्पर्धा अनेक वेळा घेता येतील, त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील कर्जत तालुक्यात एक सर्व सोयीनियुक्त अशा ॲथलेटिक्सच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबतही त्यांनी यावेळी क्रीडा मंत्र्यांना विनंती केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा