कर्जत प्रतिनधी-६ जानेवारी
कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. महाराष्ट्राला पहिल्यांदाच राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेचा बहुमान मिळाला असताना आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातही कर्जत शहरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही प्रत्येक कर्जतकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असून दिनांक ६ ते ९ जानेवारी दरम्यान या स्पर्धा कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहेत.
देशाच्या विविध भागातील महिला कुस्तीपटू कर्जत शहरात दाखल झाल्या असून यामुळे कर्जतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संपूर्ण देशात राष्ट्रीय पातळीवर फक्त महिलांची होणारी आंतर विद्यापीठ युवती कुस्ती स्पर्धा ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण देशभरातील विद्यापीठांमधून २ हजारहून अधिक युवती पैलवान कर्जतमध्ये दाखल झाल्या असून शहरात खेळाचे एक वेगळे वातावरण तयार झाले आहे.
देशाच्या विविध भागातून युवती कुस्तीपटू कर्जतमध्ये येणार असल्याने हे सर्व कुस्तीपटू आणि त्यांचे प्रशिक्षक यांची राहण्याची संपूर्ण व्यवस्था तसेच सर्व खेळाडूंना जेवण, प्राथमिक आरोग्य सुविधा, सॅनिटरी नॅपकीन, पिण्यासाठी शुद्ध पाणी, वाय-फायची सुविधा, लॉकर इत्यादी सुविधाही देण्यात आल्या आहेत.
बहुतांश स्पर्धक हे बाहेरुन येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दौंड ते कर्जत अशी येण्या-जाण्याचीही सोय देखील करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, डॉ. दीपक माने, राजेंद्र फाळके, डॉ.राजेंद्र खत्री, प्रा.डॉ. राजेंद्र नगरकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, देशभरातील विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी, कुस्ती मार्गदर्शक, पंच आणि कुस्तीवर प्रेम करणारे युवा आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment