ईट प्रतिनिधी-९ जानेवारी२०२५
खवा व्यापारी उत्पादकांचे पैसे देण्यासाठी कारमधून जात होता. ही कार पखरूड येथील बेलेश्वर देवस्थानच्या पुलावर आली असता, पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी रस्ता विचारण्याचा बहाणा करून कार थांबविली. व्यापाऱ्याने दरवाजा उघडताच त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून डिकीतील सुमारे २ लाख १३ हजार रुपये घेऊन दोघेजण दुचाकीवरून पसार झाले. ही थरारक घटना बुधवारी भरदुपारी घडली. भूम तालुक्यातील अंजनसोंडा येथील खवा व्यापारी विनोद मच्छिंद्र महाडिक हे खवाभट्टी चालकांचे पेमेंट देण्यासाठी आपल्या कारमधून (क्र. एमएच २५ एजे ७३४९) अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा गावाकडे जात होते. ते पखरूडमार्गे जाताना बेलेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावर पाठीमागून आलेल्या दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी रस्ता विचारण्याचा बहाणा करून कार रोखली. व्यापारी महाडिक यांनीदरवाजा उघडताच दुचाकीवरील दोघांनी हातातील मिरची पावडरच त्यांच्या डोळ्यात फेकली.आजुबाजुला कोणीही नसल्याने आरडाओरड करूनही फायदा झाला नाही. तोवर संबंधित दोघांनी कारची डिक्की
उघडून आतील सुमारे २ लाख १३हजार रुपये घेऊन पोबारा केला.भरदुपारी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच वाशी ठाण्याचे पोलीस निरीक्षक थोरात यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
No comments:
Post a Comment