जामखेड प्रतिनिधी २०ऑक्टोबर
कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या हिताच्या कामासाठी स्थानिक आमदार रोहित पवार हे कायमच पुढाकार घेत असतात. त्यातच कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सभासदांसाठी शेतकरी चर्चासत्राचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या शेतकरी चर्चासत्रासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
नगर जिल्ह्यात कर्जत जामखेड हा पहिला मतदारसंघ आहे जिथे ११ शेतकरी उत्पादक कंपन्याना शासनाच्या स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) अंतर्गत शासनाचे सहकार्य मिळाले आहे. या माध्यमातून आतापर्यंत कर्जत-जामखेड तालुक्यातील 14 हजार सभासद शेतकरी या शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडले गेले आहेत. स्मार्ट या सरकारी योजनेच्या माध्यमातून सरकारच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांना आर्थिक सहाय्य केलं जातं. यामध्ये कांद्यासाठी साठवणूक केंद्राची उभारणी करणे, ऑइल मिल प्लांट उभारणे, प्रोसेसिंग शेड करणे, आत्याधुनिक दाल मिलचे बांधकाम तसेच कोल्ड रूम, क्लीनिंग व ग्रेडिंग युनिट बांधकाम, शेड बांधकाम, कांदा चाळ, फूड प्रोसेसिंग युनिट व इतर विविध पिकांसाठी वेअर हाऊसची उभारणी करणे इत्यादी कामासाठी शासनाच्या स्मार्ट या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना आर्थिक सहाय्य मिळाल्याने होत आहे.
मतदारसंघातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आमदार रोहित पवार हे कायमच प्रयत्नशील असतात त्यातच त्यांनी शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करून तज्ज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा घेता येईल याचे मार्गदर्शनपर चर्चा सत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सह्याद्री ऍग्रो नाशिकचे मंगेश भास्कर, अभिनव फार्मर्स पुणे येथील ज्ञानेश्वर बोडके व येस फ्रेश फार्मर्स प्रोडूसर कंपनी सातारा येथील संजय भगत या तज्ज्ञांची उपस्थिती होती. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
कर्जत शहरातील श्रीराम मंगल कार्यालय येथे या शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना उत्पादन, वितरण, विक्री, फूड प्रोसेसिंग युनिट याबाबत अधिकची आणि सखोल माहिती देण्यात आली. ज्या भागातील शेतकरी स्वयंपूर्ण आहे त्या भागातील विकासही झपाट्याने होत असतो. कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना शासनाकडून लागणारी सर्वतोपरी मदत मिळावी या उद्देशाने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले आहेत आतापर्यंत कर्जत जामखेड मतदार संघातील 11 शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये 14 हजार हून अधिक शेतकरी जोडले गेले असून यापुढेही आणखी शेतकरी यामध्ये जोडण्यासाठी प्रयत्न केले जात असून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जातील असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
प्रतिक्रिया
मिरजगाव आणि खर्डा येथे प्रत्येकी ३ हजार टन धान्य साठवणूक क्षमता असलेले वखार महामंडळांतर्गत मंजूर केलेले धान्य गोदामाचे काम पूर्ण झाले असून आता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अंतर्गत ज्या पायाभूत सुविधा मतदारसंघात निर्माण होतील त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास वाटतो.
आमदार रोहित पवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा