जामखेड प्रतिनिधी :४ सप्टेंबर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी माता साडेतीन शक्तीपीठा पैकी एक प्रमुख शक्तीपीठ समजले जाते.
तुळजाभवानी मातेचे बुरर्हानगर (अहमदनगर) येथून निघालेला पलंग तुळजापूरला खर्डा मार्गाने जात असतो. त्यानिमित्ताने काल दि. ३ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता पलंगाचे खर्डा शहरात आगमन झाले. देवीच्या पलंगाचे खर्डा शहरातील मांढरदेवी नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी झालेल्या आरतीनंतर चौंडेश्वरी देवी मंदिराच्या समोर सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांच्या हस्ते पलंगाची आरती करण्यात आली. यावेळी उपस्थितीत खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपळघरे, मा. पंचायत सदस्य विजयसिंह गोलेकर , ग्रा.सदस्य प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे,ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते
तसेच इतर देवी प्रतिष्ठानच्या ठिकाणीही पलंगाचे पूजन करण्यात आले. यानंतर खडकपुरा गल्ली येथील तुळजाभवानी मंदिराच्या पटांगणात पलंगाचे आगमन झाले. याठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांची मोठी झुंबड उडाली होती. या दरम्यान आराधी गाणे व देवीच्या गाण्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. आई राजा उदो उदो म्हणत भक्तीचा महासागर दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी करीत होता. भाविकांनी पलंगाला मनोभावें निरोप दिल्यानंतर तुळजाभवानी मातेचा पलंग तुळजापूर कडे रवाना झाला. या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये व कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के, पोलीस कॉन्स्टेबल मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल खाडे, इत्यादी सह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment