कर्जत प्रतिनधी:५ जानेवारी
‘अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धे’च्या आयोजनाचा मान प्रथमच महाराष्ट्राला मिळाला असून राज्यातही कर्जत येथील ‘रयत’च्या दादा पाटील महाविद्यालयाला तो मिळाला आहे. शुक्रवार दि. ६ जानेवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक आहेत. ६ ते ९ जानेवारी दरम्यान या स्पर्धा कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहेत. त्यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. देशात राष्ट्रीय पातळीवर फक्त महिलांची होणारी आंतर विद्यापीठ युवती कुस्ती स्पर्धा ही एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण देशभरातील विद्यापीठांमधून २ हजारहून अधिक युवती पैलवान कर्जतमध्ये येणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेचे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जतला हा मान मिळाला आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून युवती कुस्तीपटू येणार असल्याने हे सर्व कुस्तीपटू आणि त्यांचे प्रशिक्षक यांची राहण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व खेळाडूंना जेवण, प्राथमिक आरोग्य सुविधा, सॅनिटरी नॅपकीन, पिण्यासाठी शुद्ध पाणी, वाय-फायची सुविधा, लॉकर इत्यादी सुविधाही देण्यात येणार आहेत. बहुतांश स्पर्धक हे बाहेरुन येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दौंड ते कर्जत अशी येण्या-जाण्याचीही सोय करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व युवती खेळाडूंना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
चौकट
‘‘कर्जत-जामखेडचं नाव राज्य आणि देशपातळीवर कसं जाईल यासाठी आम्ही सर्वजण नेहमीच प्रयत्न करत असतो. या प्रयत्यांना बळ देण्याचा एक भाग म्हणून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेकडं पाहता येईल. या स्पर्धेमुळं संपूर्ण देशभरातील २ हजारपेक्षा अधिक युवती खेळाडू सहभागी होत आहेत, याचा अभिमान वाटतो.’’
- रोहित पवार
आमदार, कर्जत-जामखेड
No comments:
Post a Comment