जामखेड प्रतिनधी-३ जानेवारी
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कुकडी कालव्यातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १ जानेवारी २०२३ रोजी रब्बीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील सुमारे ५४ गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडीचे रब्बी आवर्तन १ जानेवारीपासून सुरु करण्याची मागणी त्यांनी केली होती.
कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात विधानभवन येथे १५ डिसेंबर रोजी पार पडली होती. आमदार दिलीप वळसे-पाटील, अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोषकुमार सांगळे आदी या वेळी उपस्थित होते.
या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी १ जानेवारीपासून रब्बी आवर्तन सुरु करण्याची मागणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार आवर्तन सुरू झाले आहे. तत्पूर्वी डिसेंबर २०२२ रोजी कुकडी बांधकाम वितरण विभाग कोळवडी येथे शेतकरी आणि अधिकारी यांच्या समवेत पाणी नियोजनाची बैठक घेतली होती. त्यावेळी रब्बी पिकाला पाण्याची गरज असल्याने नुकसान टाळण्यासाठी १ जानेवारीपासून रब्बी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. याच मागणीचा आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करुन ती पूर्ण केली.
दरम्यान, कुकडी प्रकल्पातून सुटणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावे यासाठी रोहित पवार हे कुकडीसाठी नियमितपणे शेतकऱ्यांच्या आवर्तन पूर्व बैठका घेतात. याशिवाय कालव्यातून पूर्ण दाबाने पाणी यावे यासाठी त्यांनी कालव्याची आणि चाऱ्यांची दुरस्ती करुन घेतली. चाऱ्यांना नवीन गेट बसविले. यामुळे पाण्याची गळती रोखण्यास मदत झाली. तसेच अनेक ठिकाणी चाऱ्यांचे आणि कालव्याचे खोलीकरण केल्यामुळे पुढील भागाला पूर्ण दाबाने पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आवर्तन काळात सिंचन कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस काम करावे लागते, त्यासाठी कालव्यालगत त्यांच्या निवाऱ्यासाठीही कर्जत तालुक्यात कुकडी डाव्या कालव्यावर चौक्या बांधण्यात येणार आहेत आणि यापैकी ४ चौक्यांचं काम पूर्ण झालेलं असून उर्वरीत २ चौक्यांचं कामही लवकरच पूर्ण होणार आहे.
चौकट
‘‘शेतकरी, अधिकारी यांना विश्वासात घेऊन नियोजन केले तर शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. त्यानुसार पहिल्यापासून या दोन्ही घटकांच्या बैठका घेऊनच नियोजन करण्याचा माझा प्रयत्न असतो. पुढील आवर्तनंही शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसारच देण्याचा माझा प्रयत्न आहे. आवर्तन काळात शेतकऱ्यांनीही अधिकाऱ्यांना सहकार्य करणे, गरजेचे आहे.’’
रोहित पवार
आमदार, कर्जत-जामखेड
No comments:
Post a Comment