आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या विद्यमाने अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संस्था, पुणेचे चौथे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन २०२३ हे कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये दि. ९, १० व ११ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्याची गुरुवारी मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी काढून सुरुवात करण्यात आली. सद्गुरू संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरापासून ग्रंथ दिंडीने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी, स्थानिक नागरिक व महाराष्ट्रभरातून आलेले साहित्यिक सहभागी झाले होते.
सद्गुरू संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरापासून निघालेल्या ग्रंथ दिंडीमध्ये पालखीत गोदड महाराज यांचा 'अध्यात्म ज्ञानदीपक' हा ग्रंथ विधिवत पूजा करून ठेवण्यात आला होता. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून विविध वेशभूषा देखील साकारल्या होत्या त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले त्यांच्याच हस्ते विधिवत ग्रंथाची पूजा देखील करण्यात आली.
कर्जत शहरातील अमरनाथ विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय व सो.ना सोनमाळी विद्यालय या विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध साहित्यिकांनी देखील ग्रंथ दिंडीत आपला सक्रिय सहभाग नोंदवला हे विशेष. गुरुवारी सुरू झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाची सांगता ही शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघात अशा पद्धतीचे बालकुमार साहित्य संमेलन पहिल्यांदाच पार पडत असून यामुळे मतदारसंघांतील लहानग्यांच्या बौद्धिक विकासासाठी नक्कीच मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment