पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २५ मार्च
राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने विविध ठिकाणी उत्कृष्ट दर्जाची गोदामे उभारून शेतकऱ्यांचा शेतमाल साठवून त्यावर कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्याची सेवा निर्माण केली आहे. खर्डा या ठिकाणी सुमारे ३००० मे. टन क्षमतेचे गोदाम उभारण्यात आले असून पुढील काळात या गोदामात परीसरातील शेतकरी वर्गाने शेतमालाची साठवणूक करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे राज्य व्यवस्थापक प्रशांत चासकर यांनी केले.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे नव्याने उभारलेल्या वखारच्या गोदामामध्ये आयोजित 'शेतमाल तारण योजना' व वखार आपल्या दारी उपक्रमांतर्गत शेतकरी कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेत कृषि विभागाचे कृषि सहाय्यक, सहकार आणि पणन विभाग या विभागातील अधिकारी तसेच खर्डा व इतर गावातील शेतकरी वर्ग, शेतकरी कंपन्या, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडेरेशनचे अधिकारी उपस्थिती होते. त्याचप्रमाणे माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, चंद्रकांत गोलेकर, खर्डा वखार महामंडळाचे केंद्र प्रमुख श्री. संदीप ढवळे, सेंट्रल बँकेचे खर्डा शाखा व्यवस्थापक श्री.साळुंके, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे नाबार्ड विषयक योजना तज्ञ सादिक मनेरी, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय स्तरावरील अधिकारी श्री. विष्णू थोरात हे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रशांत चासकर म्हणाले की,
शेतकरी वर्गाच्या शेतमालाला बाजारभाव मिळत नाही या विषयावर अनेक वेळा वेगवेगळ्या स्तरावर चर्चा करण्यात येतात. उपाययोजनांबाबत सुद्धा अनेक स्तरावरील तज्ञ मंडळी सुचना करतात. शासन स्तरावर सुद्धा उपाययोजना करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जातात. परंतु शेतकरी वर्गापर्यंत ही माहिती पोहोचल्यानंतर शेतकरी मंडळीनी त्याचा फायदा घेऊन शेतमालाला बाजारभाव मिळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फायदा घेणे अपेक्षित आहे.
खरीप व रब्बी हंगामानंतर शेतमालाची काढणी करताना शेतमालाचे भाव कमी होतात. सर्व शेतकरी शेतमाल न साठवता विविध विक्रीच्या पर्यायांचा अवलंब करून शेतमाल थेट बाजारात विकतात. त्या ऐवजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात शेतकरी वर्गाने ठेवून गोदाम भाड्यावर ५०% सूट घेऊन पैशांची आवश्यकता असल्यास जमा केलेल्या शेतमालाच्या किंमतीच्या ७० टक्के रक्कम ९ % दराने २४ तासात कर्जरूपाने उपलब्ध होऊ शकते. त्याचा सर्व स्तरावरील शेतकरी वर्गाने फायदा घ्यावा असेही यावेळी बोलताना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे प्रशांत चासकर (शेतमाल तारण व्यवस्थापन तज्ञ-स्मार्ट प्रकल्प) म्हणाले.
तसेच शेतकरी वर्गाने शेतमाल घरी न ठेवता तो सुरक्षित राहावा व ३ ते ६ महिन्यानंतर बाजारभाव वाढल्यानंतर तो विकावा याकरीता सर्व शेतकऱ्यानी शेतमाल खर्डा येथील वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल ठेवावा असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य श्री. विजयसिंह गोलेकर यांनी केले.
त्याचबरोबर खर्डा वखार महामंडळाचे केंद्र प्रमुख श्री. संदीप ढवळे यांनी शेतमाल गोदामात ठेवण्याची पद्धत विषद करून सर्व उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. यानंतर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय स्तरावरील अधिकारी श्री. विष्णू थोरात यांनी वखार महामंडळामार्फत शेतकरी वर्गाचा झालेला फायदा विषद करून उपस्थितांचे आभार मानले. शेतकऱ्यांसोबत स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment