पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-६एप्रिल
कर्जत-जामखेड मतदारसंघातील नागरिकांना शहरात मिळणारे सर्व अत्याधुनिक उपचार आपल्या तालुक्यातच मिळावे यासाठी आमदार रोहित पवार हे कायमच प्रयत्न करत असतात. तसेच विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून लाखोंचा खर्च असलेल्या विविध शस्त्रक्रिया या मतदारसंघात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या तसेच शहरातील नावाजलेल्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत पार पडल्या आहेत. अशातच आता आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला करार करण्यात आला आहे.
पुण्यातील पिंपरीमध्ये असलेल्या डी वाय पाटील आयुर्वेदिक कॉलेज, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व आरोळे हॉस्पिटल जामखेड यांच्यात हा त्रिसदस्यीय करार करण्यात आला असून या करारानुसार कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व नागरिकांना विविध आजारांवर जामखेडमध्येच आरोळे हॉस्पिटल येथे आयुर्वेदिक आणि ऍलोपॅथीमधील अत्याधुनिक उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मिळणार आहेत. तसेच ज्या रुग्णांना ॲडव्हान्स ट्रिटमेंटची गरज भासेल त्यांना उपचारासाठी पिंपरी येथेही नेले जाईल.
कर्जत-जामखेडमधील सर्वच नागरिकांसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा असून याद्वारे शहरात मिळणारे उपचार हे आपल्या जामखेड शहरातच मिळणार असल्याने नागरिकांचा जाण्या-येण्याचा खर्च, मानसिक त्रास तर वाचतोच शिवाय योग्य आणि अचूक उपचार त्यांना तालुक्यातच उपलब्ध झाल्याने त्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. आमदार झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपलं वेगळेपण जपलं त्यातच आरोग्य क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत अनेक शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना योग्य ती आणि हवी ती सर्व मदत पुरवली आहे. तसेच फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत असंख्य नागरिकांना आपल्या गावातच वाड्या-वस्त्यांवर विविध उपचार घेता आले आहेत.
याशिवाय शहरात लाखोंचा खर्च असलेल्या अनेक शस्त्रक्रिया ज्या मतदारसंघात शक्य आहेत त्या मतदारसंघात आणि ज्या शक्य नाहीत अशा शस्त्रक्रिया पुण्यातील नावाजलेल्या रुग्णालयात केल्या. या दरम्यान रुग्णांना घरापासून पुण्यात नेऊन उपचारानंतर परत घरी येईपर्यंत जेवण आणि राहण्याची संपूर्ण व्यवस्था उत्तम पद्धतीने त्यांनी पार पाडली आहे. आता मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सुधारत असल्यामुळे नागरिकांचीही होणारी हेळसांड कायमची नष्ट होईल यात शंका नाही.
प्रतिक्रिया
आपल्या मतदारसंघात खासगी रुग्णालय आणि डॉक्टर हे चांगले आहेतच परंतु खासगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वच रुग्णांना परवडेल असं नाही, अशांसाठी हा करार नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. आपण मंजुर करून आणलेल्या कर्जत,जामखेड तसेच मिरजगावच्या उपजिल्हा रुग्णालयाचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. आरोग्यावर काम करणं हे मतदारसंघासाठी महत्त्वाचं असतं कारण शेवटी सामान्य लोकांचा अतिरिक्त आरोग्यावर होणारा खर्च हा आपल्याला मर्यादित ठेवता येतो.
-आमदार रोहित पवार, (कर्जत-जामखेड विधानसभा)
No comments:
Post a Comment