पोलीस वारंट न्युज नेटवर्क :१ जून
जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या सर्वात मोठी खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. नमिता आसाराम गोपाळघरे यांनी सुरूवातीला ठरल्यानुसार सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने खर्डा ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपामध्ये मोठी रस्सीखेच पहावयास मिळतं आहे.
सद्या खर्डा ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.
ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांनी स्वतः जातीने लक्ष घातले होते. मात्र सत्ताबदल होऊन ही ग्रामपंचायत भाजपकडून आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली. व सरपंचपदी नमिता आसाराम गोपाळघरे तर उपसरपंचपदी रंजना श्रीकांत लोखंडे यांची २ वर्षासाठी निवड करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे आ. रोहित पवार यांच्या सांगण्यावरून दोघांनीही आपापल्या पदाचे राजीनामे प्रशासनाकडे राजीनामे दिले असून ते मंजूरही करण्यात आले आहेत. यामुळे आता राष्ट्रवादीकडून या पुढील कार्यकाळासाठी सरपंच पदासाठी रोहिणी प्रकाश गोलेकर तर उपसरपंच पदासाठी वैभव जमकावळे यांची निवड करण्याचे ठरले आहे.
मात्र यावेळी राष्ट्रवादी व भाजपाच्या वतीने खर्डा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात यावी यासाठी मोठी युव्ह रचना केली जात असल्याची चर्चा आहे. त्यानुसार राष्ट्रवादीचे १० ग्रामपंचायत सदस्यांपैकी २ सदस्य भाजपसोबत. तर भाजपचा एक ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी बरोबर सहलीला गेल्याच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे. सरपंच पदाचा गुंता वाढला आहे. काठावर बहुमत झाल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ग्रामपंचायत सदस्यांना बाहेरगावी सहलीला पाठवले असल्याचे समजते आहे. राजकारणाच्या चढाओढीत ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या पतींचा भाव मात्र भलताच वाढला असल्याचे दिसून येत आहे.
जामखेड तालुक्याच्या राजकारणात १७ ग्रामपंचायत सदस्य संख्या असणारी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून खर्डा ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. त्यामुळे खर्डा ग्रामपंचायतचा सरपंच कोण होणार याची चर्चा जामखेड तालुक्यात जोर धरू लागली आहे. दरम्यान सरपंच पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला असल्याचे समजते आहे. परंतु प्रशासनाने सरपंच पदाच्या निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर केली नाही. तोपर्यंत ग्रामपंचायत सदस्य हे बाहेरगावी राहणार असल्याचे बोलले जात आहे.
जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्याही प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. भारतीय जनता पार्टी कडून माजी पंचायत समिती सभापती रवींद्र सुरवसे यांनी लक्ष घातले असून त्यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन सदस्य फोडल्याने मोठा रंग भरला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने डाव टाकत भाजपचा एक ग्रामपंचायत सदस्य बरोबर घेऊन या निवडणुकीत मोठी रंगत भरली आहे. त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरपंच करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी मोठी काट्याची लढत होण्याची शक्यता आहे.
तोपर्यंत खर्डा ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक तारीख झाल्यानंतर ग्रामपंचायत वर भाजपचा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार हे पाहणे मोठे औसुक्याचे ठरणार आहे.
राजीनामा दिलेल्या सरपंच व त्यांचे पती आसाराम गोपाळघरे यांनी आपल्या कार्यकाळात सर्व सदस्यांना व ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेत व समन्वय ठेवून खर्डा शहर व हद्दीतील वस्त्यांमध्ये अनेक विकास कामे केली आहेत. तसेच नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या याच कामांची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात वितरित व खर्डा येथून प्रकाशित होणारे अग्रगण्य साप्ताहिक, पोलीस वारंट या वृत्तपत्राच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड यांनी आपल्या वृत्तपत्रात या बाबत सविस्तर मुलाखत प्रसिद्ध करून सरपंच व त्यांचे पती आसाराम गोपाळघरे यांच्या कार्याचा गौरव केला होता.
एकंदर पाहता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कायम सत्ता राखण्यात यशस्वी होते की भाजपा आपल्याकडे सत्ता खेचून आणण्यात यशस्वी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
No comments:
Post a Comment