पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-६ डिसेंबर
आपल्या भारत देशाला यात्रांचा देश म्हणून ओळखले जाते हिंदू धर्माचे संस्थापक आद्य शंकराचार्यांपासून गुरु नानकां सारख्या महात्म्यांनी त्याकाळी संपूर्ण देश पादाक्रांत करुन आपापले धर्म,विचार,अनुयायी वाढवण्याचे काम केले. सध्याही देवदर्शनाच्या निमित्ताने सर्वत्र फिरणारे तीर्थयात्री, पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाणारे वारकरी ह्या पदयात्राच आहेत. या धार्मिक यात्रांबरोबरच राजकीय पदयात्राही भारताला नवीन नाहीत. अर्थात यात्रा कोणत्याही असोत त्या एक उद्दीष्ट व विचार घेऊन निघतात व समाजालाही काहीतरी देऊन जातात.
महात्मा गांधींनी काढलेल्या दांडी यात्रेत सुरुवातीला फक्त ८० लोक सहभागी झाले.हे नि:शस्त्र, अहिंसा वादी पदयात्री जगावर राज्य करणाऱ्या शक्तीशाली, जुलमी, क्रुर ब्रिटीश राजसत्तेच्या विरोधात पायी चालत होते.हळूहळू या यात्रेला व्यापक जनसागराचे स्वरुप आले आणि ब्रिटीशांनाही गुडघे टेकावे लागले. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामनात ब्रिटीशांच्या विरोधातील ज्योत पेटवण्याचे कामच या दांडीयात्रेने केले. त्याकाळी जागतिक मेडीयाने सुरुवातीला हास्यास्पद म्हणून हिणवलेल्या या यात्रेच्या ताकदीच्या यशोगाथाची नोंद पुन्हा त्याच मिडीयाला घ्यावी लागली.
अशीच एक युवा संघर्ष यात्रा सध्या राज्यात सुरु असून युवा आ.रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली ती सध्या पुणे नागपूर या ८०० कि.मी.च्या मार्गावर परीक्रमा करत आहे.
मी सुद्धा या यात्रेत सहभागी असून या यात्रेतून काय साध्य झाले? यात्रेने काय जोडले,काय कमावले? याचे पुनरावलोकन (Review), मुल्यांकन यात्रेच्या मध्यंतरीच व्हायला हवे या उद्देशाने हा लेख अतिशय तटस्थपणे लिहीत आहे.
ही यात्रा एक अभिनव संकल्पना असून सध्याच्या माहीतीजाळे व सोशल मिडीयाच्या काळात कोणतेही प्रश्न,अडचणी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समजून घेणे सोपे झाले आहे. परंतू, स्वत: चालत महाराष्ट्राचा आत्मा समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक लावलेले असताना 'तुम्ही ही यात्रा आत्ता काढू नका' असे अनेकांनी सांगूनही आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत सर्व समाजातील युवकांसाठी ही संघर्ष यात्रा यशस्वीरीत्या ध्येयाकडे चालत आहे.
जीवनासाठी आवश्यक असणारे मीठ श्रीमंत, गरीब, उच्च, निच, हिंदू, मुस्लिम,सगळ्या जातीधर्माच्या लोकांना लागते.याच मीठावर ब्रिटीशांनी कर लादला म्हणून महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढत त्याला सर्वसमावेशकता दिली. तेच राजकीय चातुर्य वापरत आ.रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेच्या शीर्षकाखाली सर्व जातीधर्मातील बेरोजगार, विद्यार्थी, शेतकरी युवकांचे प्रश्न हाती घेऊन यात्रेला यशस्वी व्यापकता दिली आहे.
जगातील सर्वात जास्त युवक भारतात आहेत व या महत्वाच्या वर्गाचा आवाज शासनापर्यंत पोहचवण्याचे उद्दीष्ट असलेली ही यात्रा शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांचे प्रश्न, महिला,दिव्यांगांच्या अडचणी,असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे दुखणे जाणून घेत विद्यार्थी,उच्चशिक्षित, स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे युवा, डॉक्टर,वकील,सरकारी व खासगी नोकरदार यांचाही आवाज कधी बनली हे या पदयात्रा करणाऱ्या संघर्ष यात्रींना देखील कळाले नाही. पायी चालताना गावखेडे,शहरातील विविध लोकांशी सहज संवाद साधता आला व त्यांचे प्रश्न,अपेक्षा समजून घेता आल्या. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा सगळा लेखाजोखा घेऊन समाजातील विविध घटकांचे प्रश्न आ.रोहित पवार विधानसभेत मांडणार असल्याचे सांगत आहेत. त्यांची विधानसभेतील आतापर्यंतची आक्रमक परंतू अभ्यासू भाषणे पाहता ते या समजून उमगून घेतलेल्या प्रश्नांना अधिक धारदार बनवून सरकारला घायाळ करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. हे सरकार महत्वाच्या प्रश्नांना बगल देऊन जनतेचं लक्ष विचलित करत असल्याचा आरोप आ.रोहित पवार करतात व संघर्ष यात्रेच्या माध्यमातून त्यांना "मुद्द्याचे बोलायला" भाग पाडणार असा इशाराही देत आहेत.
युवा संघर्ष यात्रेत महाराष्ट्रभरातून आलेले युवक आहेत. आ.रोहित पवार यांच्या कष्टाळूपणाची ओळख त्यांना यानिमित्ताने होत आहे. दररोज २३-२४ किलोमीटर चालूनही हा मोठ्या घरातील तरुण थकत कसा नाही? ते सकाळी ७ वा. पुन्हा चालायला सुरुवात करतात मग झोपेतून कधी उठतात? शारीरीक कष्टाची सवय त्यांना आहे काय? ही प्रश्न अनेक संघर्ष यात्रींना पडतो. मग आ.पवारांच्या मतदारसंघातील सहभागी यात्री त्यांना आपल्या आमदाराची दिनचर्या सांगतात.
आजोबा शरद पवारांप्रमाणे पहाटे ५ वाजता झोपेतून उठून आवरुन, वर्तमानपत्रे व इतर वाचन करत, गाडीतच नाष्टा उरकत आ.रोहित पवार हे सकाळी ८ वाजता दौऱ्यातील पहील्या गावी पोहोचतात. त्यानंतर कुठलीही घाई न करता सर्वांना भेटत,संवाद साधत प्रसंगी अधिकाऱ्यांना फोनवर सूचना करत त्या दिवशीचा दौरा रात्री उशीरा संपतो. जेवण,चहा इ. पेक्षा दौऱ्याच्या पुढच्या गावातील लोक वाट पाहत असतील याची काळजी असते. आत्ताच्या पिढीतील तरुण राजकारण्यांना आदर्श घेता येईल असा प्रचंड कष्ट करण्याची तयारी,अभ्यासू वृत्ती, संवेदनशीलता हे आ.पवारांचे वेगळेपण आहे.
अनेक संघर्ष यात्रींना त्यांच्या साध्या राहणीमानाचेही आश्चर्य वाटते. मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्म घेऊनही अगोदर स्वकष्टातून स्वत:चा उद्योग मोठा करणारा, थेट आमदारकी,खासदारकी न लढवता जिल्हा परिषदेतून राजकारणाची सुरुवात करणारा हा स्पष्टवक्ता तरुण कोणाला वाटते म्हणून आपल्या साध्या राहणीमानाची व कपड्यांची शैली बदलत नाही. अकाली पांढरे झालेले केस रंगवत बसत नाही. नदीत,विहीरीत सहज सुळकी मारताना लहानपणी मासे,खेकडे पकडल्याचे सांगायलाही लाजत नाहीत. राज्यातील सर्वाधिक काळ सत्तेत असणाऱ्या पवार घराण्यातील हा युवक लोकप्रतिनिधी स्वकष्टातून उभ्या केलेल्या कोट्यावधी रुपयांचा कारभार असणाऱ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे हे अजिबात जाणवू न देता राजकारणातही प्रचंड कष्टाळूपणाच्या गुणाची गरज असल्याचा नवा आदर्श नवीन राजकीय पिढीपुढे घालून देत आहे.
संघर्ष यात्रेत होणाऱ्या पत्रकार परीषदांमधून त्यांच्यावर विशेषत: पक्षफुटीच्या संदर्भात प्रश्नांचा भडीमार होतो. त्यावेळी गडबडून न जाता खूप आक्रमकपणे,कोणाचीही भीडभाड न ठेवता आपल्या पक्षाची, आजोबाची पाठराखण करणारा नेता म्हणूनही ते अनेकांना भावतात. परवा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या संघर्ष यात्रेवर व आ.रोहित पवार यांच्या वर जाहीर टिका केली त्यालाही तात्काळ जशास तसे उत्तर देण्याचे काम त्यांनी केले. या विरोधासाठी कोणतीही किंमत मोजायला लागली तरी चालेल हा लढवय्यापणा अचंबित करणारा आहे.
आ.रोहित पवार यांनी या यात्रेत पक्षचिन्हाचा वापर जाणीवपूर्वक टाळल्याचे जाणवते. केवळ खा.शरद पवारांचा फोटो वापरताना त्यांच्या या वयातील लढाऊपणाला व तरुणांना लाजवतील अशा उर्जेला सलामी देण्याचे जणू काम केले आहे. शरद पवारांना मानणारा एक स्वतंत्र पण मोठा वर्ग आहे. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने त्या त्या भागातील पक्षाचे व महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षाला मानणाऱ्या सर्वसामान्य लोकांना एक नवा विश्वास देण्याचे काम आ.पवार मोठ्या खुबीने करत आहेत.
आमदारकीची पहीलीच टर्म असणारे ३८ वर्षीय युवा आ.रोहित पवार व या यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे अवघ्या पंचवीशीतील रोहित आर आर पाटील ही जोडगोळी उद्याच्या महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे. या कमी वयामध्ये त्यांच्यामध्ये एवढी प्रगल्भता,पक्ष अडचणीत असताना जबाबदारीची जाणीव असणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नशीब आहे. या दोघांनी पायी भ्रमंती करत महाराष्ट्राला समजून घेणे हे त्यांच्या वैयक्तीक राजकीय व सामाजिक अनुभवाला समृद्ध करणारे तर आहेच परंतू उद्याच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या प्रक्रीयेलाही पुरक असेल.
या यात्रेवर टिका करणारे म्हणतात की ही यात्रा म्हणजे निव्वळ राजकीय फार्स आहे, येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून यात्रा निघाली आहे, त्याचा फार काही राजकीय परिणाम होणार नाही इत्यादी..
परंतू,लोकशाहीत कुठलीही सार्वजनिक घटना घडताना त्याला एक राजकीय किनार असतेच. आ.रोहित पवार यांना यातून स्वत:ला राजकीयदृष्टया प्रोजेक्ट करायचही असेल पण म्हणून त्यांनी मांडलेले मुद्दे,प्रश्न कोणालाही दुर्लक्षित करता येणार नाहीत. पुढील निवडणूकीत या यात्रेचा कितपत लाभ होईल हे येणारा काळच सांगेल. परंतू या यात्रेच्या माध्यमातून युवकांच्या, शेतकऱ्यांच्या मनात पेटलेली ठिणगी कित्येक वर्ष तेवत राहील व कोणत्याही सरकारला त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही यात शंकाच नाही.
बेरोजगारी,कंत्राटी नोकरभरती सारखे घातक निर्णय, मोठे औद्यागिक प्रकल्प व गुंतवणूक बाहेरच्या राज्यात पळवून नेल्याने होणारे युवकांच्या रोजगार उपलब्धीचे नुकसान, नोकरभरतीसाठी आकारले जाणारे अवाजवी परीक्षा शुल्क, रिक्तपदांची खंडीत झालेली भरती, पेपरफुटी व नोकरभरतीतील भ्रष्टाचार, स्कॉलरशीप व इतर शासकीय योजनांचा लाभ वेळेवर न मिळणे त्याचबरोबर शेती करणाऱ्या युवांसमोरील शेतमालाच्या भावाचा प्रश्न, विमा,नुकसान भरपाई देण्याकडे कुचराई, अवकाळी पाऊस, दुष्काळी उपाययोजनांकडे शासनाचे होणारे दुर्लक्ष ही युवकांसमोरील खरी आव्हाने आहेत. याच प्रश्नांची धगधगती मशाल घेऊन संघर्ष यात्रा चालतेय. युवक चालतोय पण घाम मात्र सरकारला फुटतोय.
_विजयसिंह गोलेकर
संघर्ष यात्री तथा संघटक- अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
९४२२२००००१.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा