पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-28 मार्च
जामखेड शहरासह तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ही अडचण ओळखून आमदार रोहित पवार यांनी अनेक ठिकाणी मोफत पाण्याचे टँकर सुरू केले होते. मात्र, भाजप आमदार, खासदार यांनी हे टँकर प्रशासनास बंद करण्यास लावले.
यामुळे तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी काल तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढत निषेध नोंदवला.
ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आज शेकडो महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन जामखेड तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला. या संतप्त महिलांनी तहसील कार्यालयात घुसून हांडे वाजवून घोषणा देऊन संताप व्यक्त केला. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. यावेळी महिलांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
जामखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागत होता. परंतु काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचे कारण सांगत प्रशासनाकडून हे टँकर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असून, महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे अद्यापही शासकीय टँकर सुरू झालेले नाहीत. त्यातच सुरू असलेले टँकर बंद करण्यात आल्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. टँकर पुन्हा सुरू न झाल्यास संतापाची तीव्रता अधिक वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
तहसील कार्यालयात जाऊन महिलांनी रिकामे हांडे वाजवून आक्रोश केला. यावेळी महिलांनी संतप्त व्यक्त करत दोन्ही आमदारांनी राजकारण न करता पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी केली.
यावेळी विजयसिंह गोलेकर, दत्तात्रय वारे, राजश्री मोरे, राजेंद्र पवार, प्रकाश सदाफुले, सुधीर राळेभात, शहाजी राळेभात, राजेंद्र गोरे, दीपक पाटील, आसाराम गोपाळघरे ,महालिंग कोरे , प्रकाश गोलेकर, श्रीकांत लोखंडे , महारुळी सरपंच अंजली ढेपे, नरेंद्र जाधव, संचालक दत्तात्रय सोले पाटील, संतोष निगुडे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिंदे, अनुराधा अडाले, प्रदीप शेटे, प्रशांत राळेभात, कुंडल राळेभात, वसीम सय्यद, महेंद्र राळेभात, सरपंच बाळासाहेब खैरे, संदीप राळेभात, प्रवीण उगले आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment