पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२५ एप्रिल
कर्जत शहरातील राजीव गांधीनगर परिसरातील तरुणाचा काठी व विटाने मारहाण करून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाखाली पुरून ठेवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
महेश उर्फ दहिशा नर्गीशा काळे (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी दोन संशयितांना कर्जत पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. तर तिसरा संशयित अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन नर्गिशा काळे (वय ४०, रा. कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, १८ एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास संशयित तुषार उर्फ तलाश शिवा काळे, अश्विनी शिवा काळे व गौरी तुषार काळे सर्व (रा. राजीव गांधीनगर झोपडपट्टी, कर्जत) यांनी फिर्यादीचा भाऊ महेश याचे मोटारसायकलवरून अपहरण केल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित तुषार काळे यास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने महेश नर्गिशा काळे यास मारहाण करून त्याचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाच्या ढिगाऱ्याखाली पुरून ठेवल्याची कबुली दिल्याचे पोलिसानी सांगितले. कर्जत पोलीस संशयितांना घेऊन जवळा येथे गेले असताना पोलीस निरीक्षक मारुती मुळक, जामखेड येथील तहसीलदार गणेश माळी व काही पंचांसमक्ष आरोपीने मृतदेह पुरलेले ठिकाण दाखवले. १९ रोजी पुरलेला मृतदेह बाहेर काढून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी संशयित तलाश उर्फ तुषार काळे व गौरी उर्फ तुषार काळे यांना अटक केली असून, अश्विनी काळे ही फरार आहे. या तीनही आरोपींविरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तुषार काळे व गौरी काळे यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दि. २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
No comments:
Post a Comment