पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१४ जुलै
आषाढ धारांचे आगमन आणि पंढरीच्या वारीची आस वारकरी, विणेकरी,टाळ मृदुंगाचा गजर करीत पायी वारी संपूर्ण राज्यातील विठ्ठल भक्तीने न्हाऊन निघाली आहे.अशातच आषाढी एकादशीच्या निमित्ताने साकत शाळेत बाल वारकऱ्यांनी विठ्ठल नामची शाळा भरवली होती.वारीचा आनंद घेण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी काढून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.शाळेतील बालक वारकरी झाले होते.पारंपरिक पोशाख करीत नऊवारी साड्या नेसून विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.काहीं हातामध्ये पताका घेत विठ्ठल नामाचा गजर करत होते. डोईवर तुळशी वृंदावन घेऊन हातात टाळ घेऊन बालवारकरऱ्यांची ही दिंडी गावातून जाताना ठिकठिकणी तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा सकरलेल्या बालकांमुळे प्रत्यक्ष विठुमाऊलीचाच आभास होत होता.बालवारकऱ्यांच्या या मांदियाळीत भक्तीचा जागर चालला होता.विठुनामच्या गजरात सारेजण दंग होते.प्रत्यक्ष वारीचाच अनुभव साऱ्यांना मिळत होता. भक्तांना विद्यार्थ्यांच्या या दिंडी सोहळ्यात पांडुरंग रुक्मिणी भेटल्याचे समाधान मिळाले.दिंडी सोहळ्याने सगळीकडे भक्तीमय वातावरण तयार झाले होते.बालचमुनीं हा सोहळा लक्षवेधी केला होता. हरिनामाचा गजर करीत दिंडीची साकत गावातून मिरवणूक काढण्यात आली.प्राथमिक शाळेची दिंडी गावातून फेरी मारून पुन्हा आनंदाने शाळेत परतली. यासाठी पालखीची छान सजावट शाळेतील शिक्षक यांनी केली. गावातून दिंडी येत असताना गावकर्यांनी ठीक ठिकाणी पालखीचे दर्शन आणि पूजा केली या ' विठ्ठल विठ्ठल ', ' ग्यानबा तुकाराम ' टाळ वाजवून जयघोष केला
विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली,डोक्यावर तुळस घेऊन वारकरी झाले होते.जणू काही विठ्ठल नामाची शाळाच भरली होती. ज्ञानमंदिरात विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेल्या बाल वारकऱ्यांचा विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर पाहायला मिळत होता.यानिमित्ताने अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.शिक्षकांसह सर्वजण मोठ्या आनंदाने या उत्साहात सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment