पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१९ डिसेंबर२०२४
राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये सुरू झाले असून विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजप नेते राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांसह विरोधकांचे देखील आभार मानले.
विधानपरिषदेचे सभापतीपद गेल्या २९ महिन्यांपासून रिक्त होते. दरम्यान उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी कामकाज पाहिले. पण आता विधानपरिषदेला नवे सभापती मिळाले असून आजपासून राम शिंदे कामकाज पाहतील.
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक घडामोडी घडत असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला असून अधिवेशनाच्या पूर्वसंधेला ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.
यानंतर विधानसभा सभापतीपती राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. तर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही वेळी विरोधकांनी चेहरा दिला नाही. एकमताने राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाल्याने सर्व आमदारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.यानंतर राम शिंदे यांनी सभापती पदाच्या खुर्ची बसताना सर्वांचे आभार मानले. तर यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्यावरून विरोधकांचे आभार मानले. तर विरोधकांनी आपल्या सभागृहाची परंपरा कायम राखल्याचे ते म्हणाले.
दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडेच सभापतीपद देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र भाजपने या मागणी अमान्य करत धक्कातंत्र वापरत विधान परिषद सभापती पदी राम शिंदे यांचे नाव जाहीर केले. यानंतर आज अधिवेशाच्या चौथ्या दिवशी त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment