पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२४ डिसेंबर२०२४
पुण्याच्या भीमथडी जत्रेत सहभागी होण्यासाठी आणि कार्निव्हलमध्ये आपले स्टॉल आणि काउंटर लावण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. मात्र, लोकांच्या या प्रचंड गर्दीच्या वेळी चोरट्यांनी गर्दीचा गैरवापर करून अनेकदा चोरीच्या घटना घडल्या. अशाच एका घटनेत पुण्यातील भीमथडी जत्रेत स्टॉलधारक महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ७१ हजार रुपयांची रोकड, पेनड्राइव्ह चोरुन नेला. ही चोरी तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसून आले
त्यावर शिवाजीनगर पोलिसांनी चौघा चोरट्यांना अटक केली आहे.
मनोज भगतसिंग पवार (वय ४१), संदीप संजय गौड (वय ३२), रतिलाल प्रेमलाल परमार (वय ५५), विकी राजू साळुंखे (वय ३५,सर्व रा. येडा चौक, जामखेड, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत भाग्यश्री मंदार जाधव (वय २८, रा. आझर्डे, ता. वाई, जि. सातारा) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सिंचननगर येथील भीमथडी जत्रेत रविवारी सायंकाळी पाच वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भीमथडी जत्रेत महिला बचत गटाचा स्टॉल आहे. स्टॉलवर कुरडया, पापड, लोणची यांची विक्री करण्यात येत आहे. रविवारी जत्रेत खूप गर्दी झाली होती. यावेळी त्यांनी आतल्या बाजूला ठेवलेल्या बॉक्समधून चोरट्यांनी ७१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. ही गोष्ट त्यांच्या लगेच लक्षात आली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी स्टॉलवरील सीसीटीव्ही पाहिले. तेव्हा रोकड चोरताना चोरटे त्यात कैद झाले होते. त्यावरुन त्यांनी भीमथडी जत्रेतील असणार्या या चोरट्यांना पकडले.सदरील घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे करत आहेत.
No comments:
Post a Comment