क्रिकेट स्पर्धेत बक्षीस जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे दुर्दैवी अकाली निधन झाल्यानंतर त्या बक्षीसाची रक्कम गोळा करत आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत ती रक्कम आयोजकांना देऊन आपल्या नेत्याचा शब्द त्यांच्या मृत्यूनंतरही पुर्ण करुन दाखवण्याचे काम जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले. हा अतिशय भावस्पर्शी प्रसंग जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे तेथील क्रिकेट रसिक तरुणांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार रोहितदादा पवार यांच्या नावाने 'आमदार चषक' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या रकमेची बक्षीसे जाहीर केली. स्पर्धेसाठी अहिल्यानगर सह आसपासच्या तीन चार जिल्ह्यातून क्रिकेट संघांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी केली. स्पर्धेचे आयोजन अतिशय भव्य करण्यात आले. परंतू, स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही दिवस अगोदर या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावरील संघासाठी बक्षीस जाहीर केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड तालुका उपाध्यक्ष हनुमंत मुरुमकर पाटील यांचे अल्पशा आजाराने अकाली व दुर्दैवी निधन झाले.
नियोजित वेळेप्रमाणे सदरची स्पर्धा सुरु झाल्यानंतर काल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्पर्धेच्या ठिकाणी आले व त्यांनी कै.हनुमंत पाटील यांनी जाहीर केलेली बक्षीसाची रक्कम गोळा करत आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांच्या हस्ते आयोजकांकडे सुपूर्द केली. कै.हनुमंत पाटील यांनी जाहीर केलेल्या बक्षीसाचा शब्द पुर्ण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या दिवंगत नेत्याला जणू भावस्पर्शी आदरांजलीच वाहिली. या घटनेमुळे मैदानावर उपस्थित स्थानिक व बाहेरील जिल्ह्यातील संघांचे खेळाडू, उपस्थित प्रेक्षक, आयोजक व आमदार रोहित पवार यांच्या सह कार्यकर्ते हे सगळेच भावूक झाले.यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार,तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, मंगेश आजबे, राष्ट्रवादी यूवकचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात,अशोक गिते, भाऊसाहेब शिंदे, हनुमंत कोचाळे, हरीभाऊ गोलेकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment