जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शासकिय धान्यगोदाम, तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या शासकीय इमारती पाडून तसेच सदरचे इमारतीवरील पत्रे, सागवानी दरवाजे, खिडक्या व सागवानी लाकडे व शासकीय मालमत्तेचा अपहार करुन नमुद सर्व शासकीय इमारती पाडुन अंदाजे २० लाख रुपयाचे नुकसान करुन सदर ठिकाणचे गाळेधारकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दहशत निर्माण करुन, जीवे मारण्याची धमकी देवुन त्यांचे गाळे जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ज्योती गोलेकरसह चार जणांवर खर्डा पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामुळे खर्डा शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १८ मार्च रोजी दुपारी ३ : ०० ते ५: ०० वाजताचे दरम्यान जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बसस्थानकासोर असलेल्या
जुना सर्व्हे नंबर २८६ नवीन सर्व्हे नंबर १३७ व गट नंबर ३६० मधील शासकिय धान्यगोदाम, तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या शासनाची मालमत्ता असल्याचे माहित असतांनाही बंद गोडाउनचे कुलुप तोडुन त्यामद्ये प्रवेश करुन सदरचे इमारतीवरील पत्रे, सागवानी दरवाजे, खिडक्या व सागवानी लाकडे काढुन नेले आहेत. तसेच शासकीय मालमत्तेचा अपहार करुन नमुद सर्व शासकीय इमारती पाडुन अंदाजे 20 लाख रुपयाचे नुकसान करुन सदर ठिकाणचे गाळेधारक उमेश मोतीलाल गुरसाळी, रघुनाथ शंकर खेडकर व रेवण गणपत कोठावळे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन, दहशत निर्माण करुन, जीवे मारण्याची धमकी देवुन त्यांचे गाळे जुलमाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार यातील आरोपी ज्योती शिरीष गोलेकर, तीचा मुलगा संग्राम शिरीष गोलेकर, जे.सी.बी.मालक सुमित सुधीर चावणे तिघेही रा.खर्डा ता.जामखेड व जेसीबी चालक तुकाराम आत्माराम सुरवसे रा.गवळवाडी ता.जामखेड या चार जणांविरोधात जामखेड तहसील कार्यालयाचे अतिरिक्त पुरवठा निरीक्षक तथा मंडळ अधिकारी विजय बापुराव चव्हाण (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 49/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(1), 331(3), 331(5), 308(2), 314, 324(2), 351(2), 351(3), 352, 329, 3(5),सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनीयम कलम-3 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंड ऍक्ट कलम -7 नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड हे करत आहेत. मात्र इतके गंभीर गुन्हे दाखल होऊनही यातील कोणत्याही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान दि. १८ मार्च रोजी दिवसा ढवळ्या शासनाच्या तीन इमारत जमिनदोस्त करत २० लाख रुपयांचे मोठे नुकसान करूनही तालुक्यातील कोणत्याही शासकीय यंत्रणेने याकडे लक्ष दिले नाही. मात्र गावातील जागृत नागरिकांनी उमेश गुरसाळी, शिवाजी भोसले, संभाजी भोसले, उमेश कोठावळे, अनिल राऊत, भोसले, दत्तात्रय भोसले, खेडकर ,उमेश गुरसाळी,
यांनी आवाज उठवत काल दि. २१ मार्च रोजी खर्डा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानुसार सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येतील असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शिष्टमंडळाला दिले.
त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. शासकीय इमारती व इतर बाबतीत जरी गुन्हा दाखल झाले असले तरी खर्डा येथील खर्डा जामखेड रोड (पूल) लगत नदी पात्रामध्ये जुना घिसाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोडवरती नदी पात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम करून नदीचे पात्र कमी करण्याचा प्रयत्न केला याबाबत सदर महिलावर तसेच इतक्यामोठ्या प्रमाणात शासकीय मालमत्तेचे नुकसान होऊनही तालुक्यातील शासकीय यंत्रणने दुर्लक्ष केले प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का असाही प्रश्न खर्डा ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा