बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येला कैक दिवस उलटल्यानंतर अखेर या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं.ज्यामुळं वाल्मिक कराडच या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं. आरोपी क्रमांक दोन वर विष्णू चाटे याचं नाव असून, प्राथमिक स्वरुपात मिळालेल्या माहितीनुसार 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध पुरावे मिळाल्याची बाब समोर आली.
दरम्यान, संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओदेखील सीआयडीकडे सोपावण्यात आले. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले. देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी आता समोर येत आहेत. यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचं उघड झालं आहे.
आरोपींनी ओलांडली क्रूरतेची सीमा...
आरोपींनी पाईपला करदोड्याने मूठ तयार करून देशमुख यांना मारहाण केली. इतकंच नव्हे तर, एका लोखंडी पाईपमध्ये क्लच वायर टाकून त्यानेही त्यांना बेदम मारहाण केली हे पुरावे सीआयडीने आरोप पत्रात नमूद केले आहेत. यामध्ये 66 भक्कम पुरावे जप्त केले असून 184 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारही या प्रकरणात महत्त्वाचे ठरले.
घटनेनंतर सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक वाहनात आढळल्याची माहिती आता समोर आली असून, या प्रकरणात फोनवरून संभाषण झालेली ऑडिओ क्लिप आणि देशमुख यांना मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिप जप्त करण्यात आली आहे. वाल्मिक कराड आणि घुले यांच्याच खंडणी प्रकरणावरून नेमकी काय चर्चा झाली हेसुद्धा कॉल रेकॉर्डमुळे समोर आलं असून, आरोपपत्रात आवादा एनर्जी कंपनीकडे कराड आणि त्याच्या साथीदारानं दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खुलासा झाला आहे.
चौकट
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केज न्यायालयात 12 मार्चला पहिली सुनावणी होणार आहे. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यानं येत्या काळात त्यांच्या अडचणींमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा राजकीय वर्तुळात आता या प्रकरणावरून कोणती धुमश्चक्री उठते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल
No comments:
Post a Comment