खर्डा प्रतिनधी/25एप्रिल2025
पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण व सुधारणा कामांसाठी खासदार निलेश लंके व आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे. या पालखी मार्गाच्या कामाच्या पुढील टप्प्याच्या पूर्ततेसाठी शासनाकडून त्वरीत पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हा मार्ग वारकरी संप्रदायातील संत एकनाथ महाराज, संत भगवानबाबा आणि संत गोरा कुंभार यांच्या पालखी यात्रा मार्गासाठी महत्त्वाचा आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ चा पहिला टप्पा पैठण ते जामखेड तालुक्यातील खर्डा पर्यंत जवळपास पूर्ण झाला असून, यामध्ये मुंगी, हातगाव, बोधेगाव, लाडजळगाव, शेकटे, मिडसांगवी, कासाळवाडी, पाटोदा, दिघोळ आणि मोहरी अशा गावांचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील पुढील कामे वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
खर्डा शहरातील विकासासाठी विशेष मागण्या
खर्डा शहरातील जातेगाव फाटा ते बसस्थानक आणि भुईकोट किल्ला या दोन किलोमीटर लांबीच्या मार्गावर पथदिवे बसवणे, रस्त्याचे कॉंक्रीटीकरण, वृक्षलागवड, गटार बांधणी आणि पदपथ तयार करण्यासह अनेक अनुषांगिक कामे यासाठी मागणी करण्यात आली आहे. या सुधारणांमुळे नागरिकांना अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध होतील.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी आमदार व खासदारांसोबत मिळून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यासंदर्भात साकडे घातले असून, या कामांसाठी केंद्रीय स्तरावर आवश्यक पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.
पालखी मार्गाचे महत्त्व व भविष्यातील अपेक्षा
हा राष्ट्रीय महामार्ग वारकरी पालखी यात्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या मार्गाच्या विकासामुळे स्थानिक भागाचा व्यापक विकास होणार आहे. सरकारकडून कामे लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना सुविधा देण्यावर भर देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष-विजयसिंह गोलेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा