जामखेड प्रतिनधी/१३जुलै२०२५
जामखेड तालुक्यातील अरणगावमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या लग्नाची तयारी झाली होती, परंतु ‘उडान’ बालविवाह प्रतिबंधक प्रकल्प, स्थानिक पोलिस आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी वेळेत हस्तक्षेप करून हा बालविवाह रोखण्यात आला. ही माहिती उडान हेल्पलाईनवर प्राप्त झाल्यानंतर, समन्वयक प्रवीण कदम आणि कार्यकर्ता योगेश अब्दुले यांनी त्वरित पोलिसांना कळवली. तत्पूर्वी, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, ग्रामविकास अधिकारी विनोद खुरुंगळे आणि उडान टीमने स्थानिक कुटुंबाशी संवाद साधून बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींबाबत माहिती दिली.
संबंधित पालकांना बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार, जर बालविवाह झाला तर दोन वर्षे सक्तमजुरी, एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, अशी माहिती समजावण्यात आली. याशिवाय, बालविवाहामुळे मुलींचे बालपण हरपते, मानसिक ताण वाढतो, आत्मविश्वास कमी होतो आणि शैक्षणिक संधींवर परिणाम होतो, ज्यामुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. अशा प्रकारे, अरणगावमध्ये बालविवाह प्रतिबंधासाठी घेतलेल्या या संयुक्त पावलांमुळे मुलीचे हक्क सुरक्षित राहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा