जामखेड प्रतिनधी/११जुलै२०२५
जवळा, तालुका जामखेड येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जवळेश्वराची रथयात्रा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या सोहळ्यादरम्यान हजारो भक्तांनी हरहर महादेवाचा जयघोष करत रथयात्रेला आपली उपस्थिती दर्शवली. रथयात्रेच्या निमित्ताने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके यांनीही जवळेश्वराचे दर्शन घेतले.
रथयात्रेची सुरुवात सकाळी मुकुटाच्या आरतीने झाली, त्यानंतर रथामध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तांनी रथाला नारळाचे तोरण अर्पण केले. दुपारी महाआरतीनंतर रथ मिरवणूक सुरू झाली, जी विठ्ठल मंदिर, बसस्थानक, मराठी शाळा, बाजारतळमार्गे सायंकाळी वेशीत परतली. यावेळी मारुती मंदिरावर दहीहंडी फोडण्यात आली आणि आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. रात्री १२ वाजता रथ जवळेश्वर मंदिरासमोर आल्यानंतर हरहर महादेवाचा जयघोषाचा समारोप झाला.
या प्रसंगी सभापती प्रा. राम शिंदे नान्नज येथून परतताना हेलिकॉप्टरने जवळेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घातली, ज्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या उत्सवात राजकीय आणि सामाजिक मान्यवरांची मोठी गर्दी होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा