अहिल्यानगर शहरातील पानटपऱ्यांमध्ये सुरू असलेल्या गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्याकडे नागरिकांकडून शहरात गुटखा विक्री सुरू असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या विरोधात मोहिम राबविण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिले. त्यानुसार 25 सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागांमध्ये छापे घालून कारवाई करण्यात आली.
पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच पोलीस अंमलदार सुनिल पवार, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे, भिमराज खर्से, राहुल डोके, रिचर्ड गायकवाड व बाळासाहेब नागरगोजे यांच्या पथकाने ही मोहीम हाती घेतली. पथकाने शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून गुटखा विक्री करणाऱ्या आरोपींवर गुन्हे नोंदवले व मुद्देमाल जप्त केला.तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत तारकपुर येथील ग्लोबल पान शॉपवर छापा टाकून अल्तमश फयाज सय्यद याच्याकडून 3,960 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. भिंगार कॅम्प परिसरातील बन्सी भाई पान शॉपवर छाप्यात आरोपी समीर अब्दुल बागवान याला अटक करताना पोलिसांनी 6,160 रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केला. मात्र त्याचे साथीदार समीर शाबीर शेख व आतिक उर्फ आकीब शेख हे फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झेंडीगेट चौकातील अल्ताफ पान शॉपवर छाप्यात मुजाहिद अल्ताफ तांबोळीला अटक करून त्याच्याकडून 7,012 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. येथेही त्याचे साथीदार समीर शेख व आतिक शेख हे फरार झाले आहेत.
या सर्व कारवायांनंतर तब्बल 7 आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 17,132 रुपयांचा गुटखा व तंबाखूचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
ही संपूर्ण कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. गुटखा विक्रीस आळा घालण्यासाठी अशा प्रकारची मोहिम आहिल्यानगर जिल्ह्यात पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा