अहिल्यानगर, दि. २३- जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी आज दि. २३ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. नैसर्गिक संकटात नागरिकांनी घाबरून न जाता संकटाचा धैर्याने सामना करा. प्रशासन मदतीसाठी तत्पर असून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना धीर दिला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रा. शिंदे यांनी दरडवाडी येथे पावसाच्या पाण्यामुळे क्षतीग्रस्त पुलाची व मोहरी येथे पावसाच्या पाण्यामुळे क्षतीग्रस्त झालेल्या तलावाची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.
मोहरी गावात नदीच्या पाण्यामुळे झालेल्या शेतपीक, शेतजमीनीची पाहणी करून ग्रामस्थांकडून नुकसानीची माहिती घेतली. जातेगाव येथे पावसाच्या पाण्याने शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. तसेच पुराचे पाणी नागरिकांच्या घरात गेल्याने घरासह घरातील मालाच्या नुकसानीची प्रा.शिंदे यांनी पाहणी केली.
ग्रामस्थांशी संवाद साधताना प्रा. राम शिंदे म्हणाले, आपत्तीच्या काळात नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. एकमेकांना सहकार्य करा. कुठलीही जिवीत व पशुहानी होऊ नये याची दक्षता घ्या. अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या झालेल्या शेतपीक, जमीन, घरे, विहिरी, पशुधन यासह इतर नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्या आहेत. एकही नागरिक नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाहीही प्रा. शिंदे यांनी यावेळी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा