जामखेड प्रतिनिधी: १४ सप्टेंबर
वन विभागाच्या अडचणीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळावी, यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मागणीनुसार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीला आमदार रोहित पवार यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आमदार झाल्यापासून रोहित पवार यांनी सातत्याने विविध विकासकामांसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर पाठपुरावा केला आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत असून यापूर्वी इको सेन्सेटिव्ह झोनचे अंतर कमी झाल्याने स्थानिक लोकांना मोठा दिलासा मिळाला. सध्या कर्जत आणि अरणगाव (जामखेड) येथे जैवविविधता उद्यान, बिबट संगोपन केंद्राची स्थापन अशी वनविभागाशी संबंधित अनेक कामे प्रलंबित आहेत. शिवाय कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी ते चखालेवाडी गट नं. ६० मधून जाणारा रस्ता, अळसुंदे ते देमनवाडी गट नं. ४७८ व ४९३ मधून जाणारा रस्ता, नांदगाव ते राक्षसवाडी रस्ता तसेच जामखेड तालुक्यातील देवदैठण व साकत या गावांना जोडणारा रस्ता ही रस्त्यांची कामेही अडली आहेत. यामुळे स्थानिक लोकांची गैरसोय होतेच पण विकासालाही ब्रेक लागतो. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी केंद्रीय वनमंत्री, वन विभागाचे सचिव, मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला आहे. त्यानुसार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत बैठक झाली.
यावेळी वन विभागामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील अडकलेल्या विकास कामांना गती देण्याबाबत चर्चा झाली. तसेच कर्जतच्या जैवविविधता उद्यानाचे सुमारे पन्नास टक्के काम झाले असून पुढील निधी सरकारने स्थगित केल्याने हे काम थांबले आहे. ते पूर्ण करण्यासाठी अधिकचा निधी देण्याची मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी बैठकीत केली.
प्रतिक्रिया
‘‘वनविभागाशी संबंधित अडचणींमुळे मतदारसंघातील रस्त्यांसह अनेक विकास कामं अडकली आहेत. याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारकडं माझा नियमित पाठपुरावा सुरु आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्याकडे झालेल्या बैठकीत या विषयांवर सविस्तर चर्चा झाली असून मंत्रिमहोदयही याबाबत सकारात्मक असल्याने पुढील काळात या अडचणी सुटतील, अशी अपेक्षा आहे.’’
रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)
No comments:
Post a Comment