जामखेड प्रतिनिधी:१९सप्टेंबर
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील डोळ्यांच्या विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन १२ ते १७ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व ६ दिवसांच्या कालावधीत विक्रमी ३५ हजार रुग्णांची नेत्र तपासणी या शिबिरादरम्यान करण्यात आली.
हे नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणे व्हिजन कॅटॅलिस्ट फंड, जतन फाऊंडेशन, रिस्टोरिंग व्हिजन, एस्सीलोर व बारामती ॲग्रो या संस्थांचे सहकार्य मिळाले. तसेच रुग्णांची तपासणी करत असताना वृद्ध, शारीरिकदृष्ट्या व्यंग अथवा विविध कारणांनी जे रुग्ण शिबिराच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा रुग्णांची तपासणी वाड्या-वस्त्यांवर भर पावसात प्रतिकूल परिस्थितीतही जाऊन डॉक्टरांनी केली व त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार करून गरज असलेल्या रुग्णांना चष्म्याचे वाटप केले.
कर्जत व जामखेड तालुक्यात आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरादरम्यान एकूण ३५ हजार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून एकूण २० हजार नागरिकांना इम्पोर्टेड क्वालिटीचे चष्मे पूर्णपणे मोफत देण्यात आले आहेत. सामाजिक बांधिलकीतून अशा प्रकारचे विविध शिबिरे कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी आयोजित केले जातात व नागरिकांच्या सोयीसाठी आमदार रोहित पवार आणि त्यांची संस्था कायमच पुढाकार घेत काम करत असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा